अत्रे ज्या ज्या क्षेत्रात गेले, तिथे त्यांनी शिखरे गाठली : पी. एल. कदम

'साहित्यप्रेमी'च्या 'वंदन आचार्यांना' कार्यक्रमात मांडले विचार


 
सिंधुदुर्गनगरी : अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे ज्या ज्या क्षेत्रात गेले, ते क्षेत्र त्यांनी पादाक्रांत केले, एवढेच नव्हे तर ते शिखरावर पोचले. असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही, असे विचार निवृत्त नगररचनाकार व लेखक पुरुषोत्तम लाडु ऊर्फ पी. एल. कदम  यांनी ओरोस येथे ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कार्यक्रमात मांडले.

ओरोस येथील ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठातर्फे आयोजित ‘वंदन आचार्य अत्रे’ यांना या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आम्ही साहित्यप्रेमी’चे समन्वयक सतीश लळीत यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. आचार्य अत्रे यांची जयंती १३ ऑगस्टला झाली. त्यानिमित्त त्यांचे व्यक्तिमत्व, चरित्र व साहित्य यावर चर्चा करण्यासाठी ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. या व्यासपीठाचा हा सातवा कार्यक्रम होता. रसिकांच्या गर्दीत झालेल्या या कार्यक्रमात ११ वक्त्यांनी सहभाग घेत आचार्य अत्रे यांचे चित्र उभे केले.

श्री. पी. एल. कदम यांनी आचार्य अत्रे यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला. ते म्हणाले की, शिक्षण, राजकारण, पत्रकारिता, साहित्य, नाटक आणि सिनेमा अशा विविध क्षेत्रांमध्ये आचार्य अत्रेंनी भरीव काम केले. यातल्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग व्यक्तिमत्व झाले. सर्वच क्षेत्रात सहजपणे यशस्वी मुशाफिरी करणारा अवलिया म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. महाराष्ट्र संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांत अत्रेंनी केवळ मुक्त वावर केला नाही तर अधिराज्य गाजवले. ते जिथे जिथे वावरले, त्या त्या राज्यांचे अनभिषिक्त सम्राट बनले. त्यांनी उत्तमोत्तम नाटके व चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केलेच, शिवाय ‘मराठा’, ‘नवयुग’ या सारख्या दैनिक, साप्ताहिकांचे संपादनही केले. लेखक, कवी, विडंबनकार, चित्रपट कथालेखक, नाटककार, दिग्दर्शक, फर्डा वक्ता, शिक्षक, राजकीय नेता, संपादक अशा  विविध गुणांनी ते मंडित होते.

विनोदी बरोबरच गंभीर नाटके : डॉ. लळीत
आचार्य अत्रे यांची नाटके या विषयावर लेखिका डॉ. सई लळीत यांनी विवेचन केले. नाटक लिहिण्यास अत्यंत नाखुश असलेले अत्रे आघाडीचे नाटककार कसे झाले, हा त्यांचा प्रवास साष्टांग नमस्कार या नाटकाच्या लेखन प्रक्रियेपासुन त्यांनी उलगडून दाखवला. आचार्य अत्रे यांची लेखनप्रकृती जरी विनोदी असली तरी त्यांनी अत्यंत गंभीर नाटकेही लिहिली. मोरुची मावशी, भ्रमाचा भोपळा, कवडीचुंबक, ब्रह्मचारी अशी विनोदावर आधारित नाटके लिहितानाच घराबाहेर, लग्नाची बेडी, उद्याचा संसार अशी गंभीर व समस्याप्रधान नाटकेही त्यांनी लिहिली. वेगवेगळी रुपे घेऊन महिलांची फसवणुक करणाऱ्या लबाड इसमाबाबत आलेली एक बातमी वाचून त्यांनी ‘तो मी नव्हेच’सारखे नाटक लिहिले आणि त्याने इतिहास घडवला. अत्रे यांची नाटके आजही तुफान गर्दी खेचू शकतात, ही त्यांच्या लेखनाची ताकद आहे, असे त्या म्हणाल्या.

विडंबन केले, पण दुखावले नाही : संध्या तांबे
ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांनी आचार्यांच्या विडंबन काव्याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, आचार्य अत्रे यांची ‘झेंडुची फुले’ हा विडंबन काव्यांचा संग्रह अमोल ठेवा आहे. विडंबन म्हणजे मूळ कवितेवर केलेली हास्यकारक टीका होय. अत्रे यांनी दिग्गज आणि ज्येष्ठ कवींच्या कवितांचे विडंबन केले. परंतु, याचे मूळ कवींना अजिबात वैषम्य वाटले नाही. उलटपक्षी त्यांना तो आपल्या कवितेचा सन्मानच वाटला. विडंबन, चेष्टा करुनही समोरच्याला न दुखवण्याचे कसब त्यांच्याजवळ होते. त्यांनी अत्रे यांच्या अनेक विडंबन कवितांची उदाहरणेही दिली.

गीते, विनोद आणि किस्से
ॲड. सुधीर गोठणकर यांनी ‘ब्रह्मचारी’ नाटकातील ‘यमुनाजळी खेळु खेळ कन्हैया’ हे नाट्यगीत सफाईदारपणे पेश केले, तसेच ‘ बादेवा अजब तुझे सरकार’ हे स्वलिखित विडंबनगीत सादर केले. प्रिया आजगावकर, मेघना उपानेकर आणि सुस्मिता राणे यांनी ‘पाणिग्रहण’ नाटकातील ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे नाट्यगीत वेगवेगळ्या ढंगात सादर केले व रसिकांची दाद मिळवली. अपर्णा जोशी यांनी ‘भरजरी पितांबर दिला फाडून’ हे गीत सादर केले.

नम्रता रासम यांनी अत्रे यांचे विनोद सांगितले व ‘आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक’ ही कविता सादर केली. सतीश लळीत यांनी आचार्यांचे अनेक किस्से सांगितले. नेत्रा दळवी यांनी ‘छडी लागे छमछम’ ही कविता सादर केली. तिला श्रोतृवंदाने ठेक्याची साथ दिली. प्रगती पाताडे यांनी ‘प्रेमाचा गुलकंद’ ही कविता सादर केली. अशा प्रकारे ११ जणांच्या योगदानातून साकारलेला हा कार्यक्रम सुमारे दोन तास रंगला. याआधी दत्तराज सोसायटीचे रहिवासी स्वानंद वाळके यांचे वडील कै. सुरेश वाळके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button