
जे. डी. पराडकर यांच्या ‘अक्षरयात्रा’ लेखसंग्रहाला अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार
कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२३-२४ चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर झाले असून लोवले (ता. संगमेश्वर) येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या ‘अक्षरयात्रा’ या लेखसंग्रहास द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
अक्षरयात्रा हे पराडकर लिखित सहावे पुस्तक असून पुण्यातील चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी स्वतःच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्याची छपाई, पुठ्ठा बांधणी व २५६ पानी निर्मिती केली. या पुस्तकाचे प्रकाशन पुणे पुस्तक महोत्सवात खासदार सुप्रिया सुळे, आयोजक राजेश पांडे व संपादक घनश्याम पाटील यांच्या हस्ते झाले होते.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार विष्णू परीट यांनी तयार केले, तर नावाची रचना अनंत खासबागदार (कोल्हापूर) यांनी केली आहे. प्रस्तावना लेखक समीर गायकवाड (सोलापूर) यांची असून, पाठराखण मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे. याशिवाय सतीश डिंगणकर यांनीही पुस्तकासाठी मोलाचे सहकार्य केले.
कोकणातील व्यक्तिमत्व, परंपरा, पर्यावरण, चालिरिती व ऐतिहासिक घडामोडींवर लेखन करणारे पराडकर यांची आजवर चपराक प्रकाशनातून दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अक्षरयात्रा या पुस्तकात पराडकर यांनी कोरोना काळात सलग शंभर दिवस लिहिलेल्या शंभर ललित लेखांपैकी ६४ लेखांचा समावेश आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेने त्यांच्या लेखनाचा गौरव केल्याने पराडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्काराबद्दल त्यांनी साहित्य परिषद आणि चपराक प्रकाशनाचे संपादक घनश्याम पाटील यांचे आभार मानले आहेत.




