
रत्नागिरीतील रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी आता ‘गोल्डन ड्रॉप’
रत्नागिरीतील रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी आता ‘गोल्डन ड्रॉप’ हे खडी-डांबराचे मिश्रण किंवा घोल वापरले जाणार आहेत. नाशिकमधील गोल्डन नेक्सेस या स्टार्टअप कंपनीने हे मिश्रण (इमल्शन) बनवले आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार कंपनीने मारुती मंदिर स्टेडिअम मागील खड्डे बुजवण्याची चाचणी केली आहे. खड्ड्यात पाणी असतानाही हा तयार घोल मजबूतपणे चिकटून राहतो.
रत्नागिरी शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील रस्त्यांवरचे खड्डेही त्या त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थानची डोकेदुखी झाली आहे. डबर, खडी-डांबराचे तयार मिश्रण तसेच पावसाळी डांबराने खड्डे बुजवले तरी ते पाऊस पडल्यावर लगेचच उखडतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाना आणि राजकीय नेते, लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. आता स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका तोंडावर असल्याने खड्ड्यांमुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना मतदारांसमोर कसे जायचे? हा प्रश्न निर्माण झाला होता.
पालकमंत्री उदय सामंत यांनीच रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्यासाठी नाशिकमधील कंपनीशी संपर्क साधून त्यांच्याकडील मिश्रणाने ओले खड्डेही कसे बुजले जातात याची चाचणी घेवून त्याची चित्रफित पाठवण्यास सांगितले. त्यानुसार कंपनीचे मालक आणि इतर अधिकारी खड्डे बुजवण्याचे मिश्रण घेवून रत्नागिरीत दाखल झाले. मारुती मंदिर येथील स्टेडिअम मागच्या रस्त्यांवरचे काही खड्डे भरण्यात आले. खड्डे भरण्यापूर्वी त्या खड्ड्यांमध्ये पाणी ओतण्यात आले. त्यानंतर कंपनीचे इमल्शन ओतून त्यावर धुमसण्यात आले.
खड्ड्यातील मिश्रण धुमसून चांगले दबले गेल्यानंतर त्यावर मिनी कॉम्पॅक्टर मशिनने रस्त्याच्या पृष्ठभागाच्या पातळीपर्यंत सपाटीकरण करण्यात आले. यावेळी रत्नागिरी नगर परिषदेच्या कर्मचार्यांनाही या खड्डे भरण्याच्या कामामध्ये सामावून घेण्यात आले. जेणेकरून हे मिश्रण घेतले जाईल तेव्हा नगर परिषदेच्या कर्मचार्यांना योग्यरित्या खड्डे भरता येऊ शकतील. या प्रयोगानतर शहरातील इतर भागातील खड्डे बुजवण्यासाठी या तंत्राचा वापर होण्याची शक्यता आहे.




