
उल्लास ॲप वर नोंदणी झालेल्या असाक्षरांची रविवारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी
रत्नागिरी, दि. १९ ):- केंद्र शासन पुरस्कृत, “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” सन 2022-23 ते सन 2026-27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. उल्लास ॲप वर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी असाक्षर व्यक्तीनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर रविवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. यावेळी स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार यांनी केले आहे.
ऑफलाईन पद्धतीने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेण्यात येत आहे. ज्या शाळेतून उल्लास अॅपवर असाक्षर व्यक्तीची नोंदणी केलेली आहे व २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या ELNAT परीक्षेत NEED IMPROVEMENT असणारे असाक्षर अशा सर्वांनी ही पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. सदर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तीना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत १४ हजार २०० इतक्या असाक्षरांची नोंद उल्लास अॅपवर ऑनलाईन पध्दतीने झालेली आहे.
परीक्षेस जाताना शक्य असल्यास असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आयकार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा. (फोटोबाबतची सक्ती करु नये.) तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीचे स्वतःचे मतदान ओळखपत्र/आधारकार्ड/पॅनकार्ड/बँक पासबुक इत्यादीपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. जेणेकरुन उत्तर पत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरणे तसेच असाक्षर व्यक्तीचा परीक्षा नोंदणी अर्ज भरणे शक्य होईल. प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असून एकूण १५० गुणांची आहे. अनुक्रमे भाग क (वाचन) ५० गुण, भाग ख (लेखन) ५० गुण, भाग ग (संख्याज्ञान) ५० गुण, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील, कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेल जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता येतील, परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत.
परीक्षेची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी ३ तासांचा असेल. (दिव्यांग व्यक्तीसाठी ३० मिनिटे जादा वेळ) परीक्षार्थी सदर परीक्षेसाठी वरील कालावधीत कधीही येऊ शकेल. उपस्थित परीक्षार्थीना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असेलेला पेपर मिळेल. मराठी माध्यमातून परीक्षा आयोजित करणेत येईल. अपवादात्मक परीक्षा केंद्रांवर इतर माध्यमांचे परीक्षार्थी आल्यास त्याबाबतची जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (योजना) यांचेकडून करण्यात येत आहे. उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगाची शाई असलेला पेन वापरु नये. यु-डायस क्रमांकानुसार असाक्षरांची नोंदणी केलेली प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असेल. परीक्षेसाठी उल्लास अॅपवरील नोंदणीकृत असाक्षर व्यक्तीच परीक्षा देण्यास पात्र असेल. उल्लास अॅप वर ऑनलाईन नोंदणी केलेली नसल्यास परीक्षा देता येणार नाही. एफएलएन परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या असाक्षर व्यक्ति परिक्षेपूर्वी उल्लास ॲपवर नोंदणी करू शकतात.
सदरची परीक्षा ही प्रौढांची असल्याने तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि इतर महत्वाच्या बाबीसाठी पूरक असल्याने परीक्षा केंद्रावरील वातावरण या परीक्षार्थीसाठी आनंदाचे व उत्साहाचे ठेवण्याची जबाबदारी क्षेत्रीय यंत्रणेतील प्रत्येक घटकाची आहे, परीक्षा केंद्रावरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा असाक्षरतेबद्दलचा दृष्टीकोन सहानुभूतीचा व मदतीचा असावा. म्हणजे परीक्षा शिस्तबध्द पध्दतीने घेण्यात येत असली तरी परीक्षार्थीसाठी वातावरण खेळकर असावे, जेणेकरुन परीक्षार्थीवर कसल्याही प्रकारचा ताण येणार नाही. अशा सूचना सर्व क्षेत्रीय अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.
देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तीमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन. लेखन) व संख्याज्ञान विकसित करून देशातील १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातोल असाक्षर व्यक्तीना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबीचा समावेश आहे. स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रौढ नव साक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसीत करता येतील. त्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य/ केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित मंत्रालये /विभागांच्या सहाय्याने केली जात आहे.
१४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे हो योजना स्वीकारली आहे. त्यानुसार २५ जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी साठी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्य नियामक परिषदेचे अध्यक्ष शिक्षणमंत्री असून राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष शालेय शिक्षण प्रधान सचिव हे आहेत. जिल्हा नियामक परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आणि जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) आहेत. तालुकास्तरावर तहसिलदार व गटविकास अधिकारी हे अनुक्रमे तालुका नियामक आणि तालुका कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांच्यावर या कार्यक्रमाची जबाबदारी आहे. या योजनेत शाळा हे एकक आहे.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्रक/गुणपत्रक देण्यात येईल.




