
व्होट डिलीट करता येत नाही, राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे जोरदार प्रत्युत्तर
काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केल्याने देशातील राजकारणात सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे व्होट डिलीट करण्याचा आरोप केला आहे. तर आता या आरोपांवर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राहुल गांधी यांच्या या आरोपांवर उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून लवकरच पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देखील एक्स वर निवडणूक आयोगाने दिली आहे.
राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे. तसेच कोणताही सामान्य नागरिक ऑनलाइन व्होट डिलीट करु शकत नाही असा दावा देखील त्यांनी केला आहे.कोणताही मतदार ऑनलाइन पद्धतीने व्होट डिलीट करु शकत नाही. प्रभावित व्यक्तीला ऐकण्याची संधी दिल्याशिवाय कोणतेही व्होट हटवता येत नाही. म्हणजेच ज्या व्यक्तीचे व्होट वगळण्यात आले आहे. त्या व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळते आणि या प्रक्रियेशिवाय कोणतेही व्होट डिलीट करता येत नाही असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे. 2023 मध्ये, आलंड विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले आणि निवडणूक आयोगाने स्वतःच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खटला दाखल केल्याची माहिती देखील निवडणूक आयोगाने दिली आहे.