
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंगफेक, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, “स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायची लाज वाटणाऱ्या बेवारस..”
शिवाजी पार्क : मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाज कंटकांनी रंग फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पुतळ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात लाल रंग पडलेला आढळून आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली. यानंतर उद्धव ठाकरेही या ठिकाणी आले होते. त्यांनी या प्रकरणी आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?
“आज घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. यामागे अशी व्यक्ती असू शकते ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते. कुणीतरी लावारिस माणसाने हे केलं असेल. बिहारमध्ये जसा मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न करण्यात आला असाच कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग हा असू शकेल. तूर्तास पोलीस या प्रकरणी शोध घेत आहेत. पुढे काय होतं आहे आपण पाहू.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
पोलिसांनी सांगितलं आहे की आम्ही यामागे कोण आहे ते शोधून काढू. पण मी पुन्हा सांगतो स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटणारा बेवारस किंवा महाराष्ट्र पेटवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केलेला दिसतो आहे. १८ वर्षांपूर्वीही असंच घडलं होतं. भावना तेव्हाही तीव्र होत्या आजही तीव्र आहेत. पण आम्ही शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.




