
‘लोटिस्मा’ वाचनालयाच्या संग्रहालयासदैनिक ‘केसरी’सह दुर्मीळ अंकांची भेट
चिपळूण :: येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे संग्रहालयात लोकमान्य टिळकांच्या दैनिक केसरीसह महत्त्वाचे दुर्मीळ अंक नुकतेच भेट स्वरुपात दाखल झाले आहेत. दैनिक केसरीचे माजी सहसंपादक वासुदेव कुलकर्णी यांनी हे अंक वाचनालयाला भेट दिले आहेत.
दैनिक केसरीचा पहिला अंक ४ जानेवारी १८८१ रोजी प्रकाशित झाला होता. विशेष म्हणजे या अंकाचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. इंग्रज सरकारला धडकी भरविणाऱ्या या दैनिक केसरीचे पुढे लोकमान्य टिळक संपादक झाले होते. मराठी नियतकालिकात महत्त्वाचा अंक म्हणजे मनोरंजन मासिकाचा दिवाळी अंक होय. महाराष्ट्रात दिवाळी अंकाची मोठी परंपरा आहे. दरवर्षी दिवाळीत रसिक वाचक विविध दिवाळी अंकांच्या प्रतिक्षेत असतात. मराठी साहित्य विश्वात दिवाळी विशेषांकाची परंपरा मनोरंजन मासिकाने सुरू केली. १९०९ साली पहिला दिवाळी अंक मनोरंजनने प्रकाशित केला होता. मनोरंजन दिवाळी अंकासह वैचारिक साहित्यात अग्रेसर असलेल्या माणूस मासिकाचा जून १९६१चा पहिला अंक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शासनाला सळो की पळो करून सोडणाऱ्या आचार्य अत्रे यांनी सुरू केलेला दैनिक मराठाचा १५ नोव्हेंबर १९५६चा पहिला अंक, समतानंद अनंत हरी गद्रे यांच्या संपादनाने प्रसिद्ध झालेला मौज मासिकाचा अंक आता वाचनालयाच्या संग्रहालयात पहायला मिळणार आहे.
या अमूल्य भेटीसाठी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी वासुदेव कुलकर्णी यांना धन्यवाद दिले आहेत. वाचनालयाच्या संग्रहालयाला महत्त्वाचा दस्तऐवज मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.