
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, आता 52 वर्षांखालील सर्व शिक्षकांसाठी ‘टीईटी’ परीक्षा अनिवार्य होणार!
TET Exam Compulsory : सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. यानुसार 52 वर्षांखालील सर्व शिक्षकांना आता ‘टीईटी’ देणे बंधनकारक होणार आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबरला होणाऱ्या ‘टीईटी’ परीक्षेसाठी राज्यातील हजारो शिक्षकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या नियमानुसार फेब्रुवारी 2013 पासून शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या शिक्षक भरती या नियमाच्या आधारे झाल्या; मात्र 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना ही अट लागू नव्हती. आता सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात निकाल देताना सर्व शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
उत्तर प्रदेशसह काही राज्यांनी याबाबत याचिका दाखल केल्याचे समजते. मात्र महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. परिणामी, राज्यातील जवळपास 95 हजार शाळांमधील दीड ते पावणे दोन लाख शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना फक्त दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत परीक्षा न पास झाल्यास सक्तीने निवृत्ती देण्याचा इशाराही न्यायालयाने निकालात दिला आहे. त्यामुळे येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी टीईटी परीक्षा अनेक शिक्षक देणार असल्याचे राज्यभर दिसत आहे.
15 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू
राज्यातील सर्व व्यवस्थापनाखालील शाळांमध्ये – मग त्या सर्व परीक्षा मंडळांच्या असोत, अनुदानित, विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित – पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी वर्गांवर शिक्षक, शिक्षणसेवक म्हणून नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा पास करणे अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू होईल.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल; सरकारकडून नवा निर्णय जाहीर
3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. 10 ते 23 नोव्हेंबरदरम्यान प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. पेपर 1 हा 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 पर्यंत, तर पेपर २ दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 पर्यंत पार पडेल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. या संदर्भातील अधिकृत माहिती https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
Read more news like this on marathi.timesnownews.com




