
सोशल मीडियावर फिरत असलेला चोरीचा व्हिडिओ चिपळूण मधील नाही तर नाशिक मधील, पोलिसांचे स्पष्टीकरण
सध्या सोशल मीडियावर कोणतीही खात्री न करता व्हिडिओ फॉरवर्ड केले जातात मात्र त्यामुळे यंत्रणेची मोठी धावपळ उडते
सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओमुळे चिपळूण शहरात खळबळ उडाली होती.दोन अनोळखी व्यक्तींनी पाणी मागण्यासाठी इमारतीत प्रवेश करून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चिपळूणमधील प्रकार म्हणून दाखवण्यात आला. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र , तो व्हिडिओ चिपळूणमधील नसून नाशिकमधील आहे. चिपळूण पोलिसांनीही या प्रकरणात स्पष्ट केले आहे की, चिपळूण शहरात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. संबंधित व्हिडिओ नाशिकमधील असल्याचे निश्चित झाले असून, चिपळूणमध्ये तो गुन्हा घडल्याची बातमी ही दिशाभूल करणारीआहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये काही काळ गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर परिस्थिती स्पष्ट झाली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच खात्रीशिवाय सोशल मीडियावरील माहिती पुढे पाठवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.