
दापोली तालुक्यातील केळशी येथून चार लाखांचा अमली पदार्थ जप्त
दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे चार लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात अबार इस्माईल डायली (वय ३२) या संशयितावर कारवाई करण्यात आली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताच्या राहत्या घराच्या मागील पडवीत गडद लाल सोनेरी रंगाच्या वेस्टर्नमध्ये आणि हिरव्या रंगाच्या आवरणात बांधलेला सुमारे ९९८ ग्रॅम चरस सापडला. तपकिरी रंगाचा, तीव्र वास असलेला हा अमली पदार्थ प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळण्यात आला होता. त्यावर “6 गोल्ड” अशी इंग्रजी अक्षरे आणि कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला आढळला. तसेच हा अमली पदार्थ पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवलेला होता.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. यादव, पी.एस.आय. पाटील, हेडकॉन्स्टेबल मोहिते, हेडकॉन्स्टेबल ढोले, पोलीस कॉन्स्टेबल भांडे, टेमकर, दिंडे तसेच एल.पी.सी. पाटेकर यांनी संयुक्तपणे केली.
सदर प्रकरणी पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.