
रत्नागिरीची विजेता मोर्ये ठरली “द रॉयल क्वीन ऑफ इंडिया २०२५”
राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर विजेतेपदाची दुहेरी कामगिरी : गृहिणी ते सौंदर्यवती अनन्यसाधारण प्रवास
रत्नागिरी : शहरातील मांडवीची सुकन्या पूर्वाश्रमीची अंकिता अरविंद चौघुले आणि आताची विजेता विजय मोर्ये (कोलधे-कुंभारगाव, ता. लांजा) हिने नुकत्याच झालेल्या राज्य आणि राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये दुहेरी मुकुट पटकावून रत्नागिरीचा मान उंचावला आहे. पुणे येथे झालेल्या “मी होणार महाराष्ट्र सौंदर्यवती – सिझलिंग क्वीन २०२५” या राज्यस्तरीय स्पर्धेत ती विजेती ठरली. त्याचबरोबर पुणे येथील द रॉयल ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या “द रॉयल क्वीन ऑफ इंडिया २०२५” या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही तिने विजेतेपद मिळवले. या राष्ट्रीय विजयानंतर विजेताच्या डोक्यावर मलेशियाहून आणलेला तब्बल ४५ हजार रुपये किंमत असलेला रॉयल क्राऊन घालण्यात आला. हा मुकुट तिच्या मेहनतीचे, आत्मविश्वासाचे आणि तिच्यावर झालेल्या पाठिंब्याचे प्रतीक ठरला.
विजेता मोर्येचा प्रवास रत्नागिरीतील नवनिर्माण कॉलेजमध्ये मिस कॉन्टेस्टपासून सुरू झाला. त्यानंतर बहर युवा महोत्सव, मिस रत्नागिरी, मिसेस श्रावण क्वीन ऑफ रत्नागिरी (पहिली रनरअप), स्मार्ट श्रावण सखी (दुसरी रनरअप) या स्पर्धांतून तिचा आत्मविश्वास वाढत गेला आणि आता तिने राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवली.
या यशाचे श्रेय तिने पती विजय मोर्ये, आई, भाऊ तुषार, वहिनी कावेरी, भाची लिरा तसेच पुण्यातील नणंद-परिवार (मांडवकर), सासर व माहेरचे नातेवाईक, मित्र, हितचिंतक, गुरुजन, तसेच द रॉयल ग्रुपचे संचालक नितीन झगरे व आयोजक, कोरिओग्राफर व ग्रूमर यांना दिले.
“रॉयल क्वीन ऑफ इंडिया २०२५- विजेता” या किताबासोबत तिला बिग क्राऊन (मलेशिया), ट्रॉफी, गोल्डन सॅश, सर्टिफिकेट, मेडल, मानपत्र, गिफ्ट व्हाउचर यांसह ॲड शूट, फिल्म वर्क, सिरीयल, मॅक्झिन शूट, होर्डिंग व स्टँडीवर फोटो, एक वर्ष ब्रँडिंग आणि विविध सोहळ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती यांसारख्या संधी मिळाल्या आहेत.
विजेता विजय मोर्येचे हे यश एका गृहिणीपासून ते राष्ट्रीय क्वीन होण्यापर्यंतचा संघर्ष आणि आत्मविश्वासाचे दैदिप्यमान उदाहरण ठरले आहे.