
चिपळूण अर्बन बँकला महाराष्ट्रातील ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्रदान
चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूणला महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ₹३०० कोटी ते ₹५०० कोटी ठेवी असलेल्या बँका गटात चिपळूण बँकेला प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला.
सदर पुरस्कार वितरण समारंभ दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी पंचवटी, नाशिक येथील ‘श्री स्वामीनारायण कन्व्हेन्शन सेंटर’ येथे पार पडला. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष मा. श्री. प्रविण दरेकर व फेडरेशनचे अध्यक्ष श्री. अजय ब्रम्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुरस्काराचा मान केवळ बँकेच्या संस्थेच्या गौरवात भर घालत नाही, तर संचालक मंडळ, व्यवस्थापन, कर्मचारी, सभासद, ग्राहक व हितचिंतक यांनाही प्रोत्साहन व आनंद मिळतो. मा. संचालक मंडळाच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुषार सूर्यवंशी, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने प्रचंड मेहनत घेतल्यामुळे हा पुरस्कार बँकेच्या ताफ्यात आला, असे बँकेकडून सांगितले गेले.
पुरस्कार स्वीकारताना चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. मोहनशेठ मिरगल, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष श्री. सतीश आप्पा खेडेकर, तज्ज्ञ संचालक ऍड. श्री. दिलीप दळी, संचालक श्री. प्रशांत शिरगांवकर, श्री. समीर जानवलकर, श्री. मिलिंद कापडी, श्री. रत्नदीप देवळेकर, श्री. समीर टाकळे आणि सीईओ श्री. तुषार सूर्यवंशी उपस्थित होते.
चिपळूण अर्बन बँकेस मिळालेला हा पुरस्कार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरला असून, बँकेच्या कार्यक्षमतेला राज्यस्तरीय मान्यता मिळाल्याचा गौरव स्थानिक स्तरावर व्यक्त केला जात आहे. बँकेच्या संचालक मंडळाचे व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन होत आहे.




