
सेवा पंधरवडा ; खेड तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे- तहसीलदार सुधीर सोनवणे
रत्नागिरी दि. 14 () : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सेवा पंधरवडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार सुधीर सोनवणे यांनी केले आहे.
अभियान तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे.
पहिला टप्पा- पाणंद रस्तेविषयक मोहीम 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग, शेत पाणंद रस्त्यांचे अभिलेख अद्यावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे व सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. या कामकाजाकरिता तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी, सदस्य गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, पोलीस निरीक्षक असून, सदस्य सचिव तहसिलदार आहेत. याचप्रमाणे ग्रामस्तरीय समिती ( मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक) स्थापन करण्यात आलेली आहे. ग्रामस्तरावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कालावधीत शेतरस्ते मिळण्याबाबत, रस्त्यांबाबत तक्रारी / अतिक्रमण बाबत जास्तीत जास्त अर्ज समितीकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतर या समिती रस्त्यांची यादी करुन 17 सप्टेंबर रोजी ग्रासमसभेमध्ये मान्यता घेण्यात येणार आहे.
महसूल विभाग- गाव नकाशावर नोंदी नसलेल्या परंतु, वापरात असलेल्या रस्त्यांचे व अतिक्रमित रस्त्यांबाबत रस्ता अदालत घेणार आहेत. सर्व रस्त्यांची गाव नमुना 1 (फ) मध्ये नोंद घेऊन सर्व रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे.
भूमी अभिलेख (मोजणी विभाग)- गाव नकाशावर नोंद नसलेले व व अतिक्रमित रस्त्यांची मोजणी करण्यात येवून रस्त्यांचे Geo Referencing करणे, सिमांकन व हददीचे सिमा चिन्ह (Boundary Pillars ) स्थापन करण्यात येणार आहे.
ग्रामविकास विभाग- शिवार फेरीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी/ग्रामविकास अधिकारी सहभागी होतील व रस्त्यांच्या प्रस्तावांबाबत 17 सप्टेंबर रोजी आयोजन करुन ग्रामसभा ठराव करण्यात येतील.
पोलीस विभाग- आवश्यकतेनुसार अतिक्रमित रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी पोलीस संरक्षण देणार आहेत.
दुसरा टप्पा – सर्वांसाठी घरे 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालीवधीत दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. खेड उपविभागातील सन 2011 पूर्वीची रहिवास प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांची यादी
तयार करण्यात येवून सदरची अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणे.
तिसरा टप्पा नाविन्यपूर्ण उपक्रम 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये खेड उपविभागातील कातकरी समाजातील व्यक्तींना जातीचे दाखले / आधारकार्ड/ रेशन कार्ड / मतदार नोंदणी तसेच ज्या लाभार्थी यांना शासनामार्फत घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र, घरकुल बांधण्यासाठी जमीन उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून खासगी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.




