
सेवाभावी संस्था प्रबोधन समिती’ची स्थापना
महाराष्ट्रातील २७ हजार स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन व एकत्र आणण्याचा उद्देश
रत्नागिरी: महाराष्ट्रात गेली २७ वर्षे स्वयंसेवी संस्था क्षेत्रात कार्यरत असलेल्या कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सुनीता मोडक यांनी ‘सेवाभावी संस्था प्रबोधन समिती’ या नव्या संस्थेची स्थापना केली आहे. या समितीचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील सुमारे २७ हजार स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन करणे, एकत्र आणणे आणि त्यांच्या कामाला योग्य दिशा देणे हा आहे. या समितीमध्ये राज्य, विभाग आणि जिल्हा स्तरावर एकूण २,५०६ पदांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजात सरकार सर्वत्र पोहोचू शकत नाही, त्यामुळे स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक असतो. विशेषतः कोरोना साथीच्या काळात या संस्थांनी प्रशासनाच्या मदतीला धावून येत उत्कृष्ट काम केले, मात्र त्यांना शासकीय मदत मिळाली नाही. केवळ काही ठराविक मोठ्या संस्थांनाच निधी मिळतो, तर अनेक छोट्या संस्थांना निधी कसा मिळवायचा किंवा शासकीय योजनांचे प्रोजेक्ट कसे मिळवायचे याची माहिती नसते, असे डॉ. मोडक यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर, स्वयंसेवी संस्था प्रबोधन समिती अशा दुर्लक्षित आणि मोडकळीस आलेल्या संस्थांना मदतीचा हात देईल.
या समितीची उद्दिष्टे आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक क्षेत्रावर आधारित आहेत. अनेकदा एका संस्थेला एकाच वेळी अनेक विभागांमध्ये काम करण्याची माहिती नसते, त्यामुळे त्यांच्या कामात गोंधळ निर्माण होतो. ही समिती त्यांना योग्य विभागाशी जोडून मार्गदर्शन करेल आणि निधी मिळवण्यासाठी मदत करेल, असे डॉ. मोडक यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या सहा विभागांमध्ये कार्य सुरू
समितीने संपूर्ण महाराष्ट्रातील सहा विभाग, ३६ जिल्हे आणि ३५८ तालुक्यांमध्ये काम सुरू केले आहे. राज्य कार्यकारणीवर २७ सदस्य आहेत, तर त्यांच्या उपसमित्यांमध्येही २७ सदस्य आहेत. याशिवाय, सहा विभागांमध्ये प्रत्येकी सात पदे (अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, संपर्कप्रमुख आणि सदस्य) नियुक्त करण्यात आली आहेत, ज्यामुळे ४२ पदाधिकारी कार्यरत असतील. जिल्हा आणि तालुका स्तरावरही प्रत्येकी सात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे एकूण २,५०६ पदांवर कार्य होईल.
डॉ. मोडक यांनी सांगितले की, उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी मंत्रालयात वेळ देऊन समितीच्या कार्याची माहिती घेतली आणि रत्नागिरीत येण्याचे आश्वासन दिले. कोकणातील निसर्गाच्या आणि सकारात्मक विचारसरणीच्या प्रेरणेने या समितीची स्थापना झाली असून, पहिल्या टप्प्यात कोकणातील ५,००० संस्थांना सोबत घेऊन काम सुरू करण्यात येणार आहे. येत्या सहा-सात महिन्यांत एक भव्य अधिवेशन आयोजित करण्याचाही मानस आहे.
उद्या उद्योगांमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी येथील वि. दा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर येथे उद्या, शनिवार, १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. शालिनीताई ठाकरे यांच्या उपस्थितीत या संस्थेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, आणि औरंगाबाद या सहा विभागांतील सेवाभावी संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डॉ. सुनीता मोडक यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना आवाहन केले की, ही बातमी जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळू शकेल.




