
आदिशक्ती अभियानांतर्गत मिरजोळे ग्रामपंचायत समितीच्या अध्यक्षपदी सिमरन जाधव यांची निवड

मिरजोळे : महिलांना सक्षम बनवण्यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ अंतर्गत मिरजोळे ग्रुप ग्रामपंचायतसाठी स्थापन करण्यात आलेल्या आदिशक्ती समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्या सिमरन सुभाष जाधव यांची निवड करण्यात आली आहे. महिलांना त्यांचे अधिकार आणि कर्तव्यांविषयी माहिती देऊन त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे.
हे अभियान महिलांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करेल. या निवडीबद्दल बोलताना, सिमरन जाधव यांनी सर्व महिलांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि या अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी समितीचे इतर सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीमुळे गावातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.




