
देशभरात फटाक्यांवर बंदी घालायला हवी! प्रत्येकाला स्वच्छ हवेचा अधिकार. दिवाळीच्या तोंडावर सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत!
दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर चिंता व्यक्त केली. केवळ दिल्ली नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ हवेचा अधिकार आहे. प्रदूषणमुक्त हवा राजधानी दिल्लीपुरती मर्यादित ठेवण्याचा विशेषाधिकार मानला जाऊ शकत नाही. संपूर्ण देशभरात फटाक्यांवर बंदी घालायला हवी, असे परखड मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शुक्रवारी व्यक्त केले. फटाकेबंदी फक्त दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रात का लागू करावी? उर्वरित राज्यांत का नाही? असे सवाल न्यायालयाने उपस्थित केले.
दिल्लीत फटाक्यांची निर्मिती, विक्री आणि वापरावर संपूर्ण वर्षभर कडक बंदी घातली आहे. एप्रिलमध्ये तत्कालीन न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता. त्या निर्णयाला आव्हान देत फटाके विक्रेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर शुक्रवारी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी फटाके व्यापारी महासंघातर्फे वरिष्ठ वकील डी. एस. नायडू यांनी बाजू मांडली. प्रदूषण कमी होईल यादृष्टीने फटाक्यांच्या निर्मितीमध्ये खबरदारी घेतली गेली. सुरक्षित उत्पादनाची हमी दिल्यानंतरही न्यायालयाने आमची विनंती मान्य केली नव्हती, असा युक्तिवाद ॲड. नायडू यांनी केला. याचवेळी वरिष्ठ वकील के. परमेश्वर यांनी फटाकेबंदीचा लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असल्याचा दावा केला. दिल्लीत फटाक्यांवर पूर्ण वर्षभर बंदी घालण्याच्या आदेशामुळे फटाके तयार करणाऱ्या तसेच व्यापार करणाऱ्या कुटुंबांवर परिणाम होईल. या व्यवसायावर पाच लाख कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान प्रदूषणाची चिंता आहे. परंतु उत्पादन, व्यापार आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातल्याचाही गंभीर परिणाम होणार आहे, असे म्हणणे परमेश्वर यांनी मांडले. त्यांच्या युक्तिवादाची नोंद खंडपीठाने घेतली. मात्र दिल्लीसह देशभरातील प्रदूषणाच्या समस्येचा विचार करता सर्व राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालायला पाहिजे, असे परखड मत सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केले.
गेल्या हिवाळय़ात मी अमृतसरमध्ये होतो. तेथील प्रदूषणाची स्थिती दिल्लीपेक्षाही भयंकर होती. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न विचारात घेत फटाक्यांबाबत जे काही धोरण असायला हवे, ते संपूर्ण देशभर लागू केले पाहिजे. देशातील उच्चभ्रू नागरिक इथे आहेत म्हणून आपण दिल्लीला विशेष वागणूक देऊ शकत नाहीत. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा विचार करुन संपूर्ण देशभरात फटाक्यांवर बंदी घातली पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण सूचना सरन्यायाधीशांनी केली.




