
मी गोहाटीला गेलो नसतो तर मराठी भाषेचा मंत्री झालोच नसतो- उद्योग मंत्री तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत
सूत्रसंचालकांनी माझा परिचय करून देतांना मी आजवर मंत्री म्हणून कोणकोणती पदे भुषविली आहेत याची माहिती दिली. हा परिचय सुरू असतांना मला भीती वाटली की, या सांगतील हे उच्चशिक्षण मंत्री असतांना गोहाटीला गेले.आणि तेथून उद्योग मंत्री, मराठी राजभाषा मंत्री म्हणून आले. पण मी गोहाटीला गेलो नसतो तर मराठी भाषेचा मंत्री झालोच नसतो, असे प्रतिपादन उद्योग मंत्री तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि शिक्षक गौरव समितीच्या वतीने आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात सामंत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सामंत म्हणाले, मी मराठी मंत्री आहे. राज्यमंत्री नसून आंतरराष्ट्रीय मंत्री आहे. कारण मराठी भाषेचे बृहन्मंडळे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मराठी भाषा सातासमुद्रापार पोहचली आहे. उद्योग मंत्री म्हणून कोणी विचारत नाही. परंतु, मराठी भाषा मंत्री म्हणून सगळे बोलवतात. मला मराठी भाषा मंत्री असल्याचा आनंद वाटतो. मंत्री म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असतांना मराठी भाषा भवन, अद्यावत विश्वकोष असे विविध उपक्रम राज्य शासनाकडून हाती घेण्यात आले आहेत.




