
दापोली तालुक्यातील केळशी येथील वाळू टेकडीच्या नादात विकास रखडला
दापोली तालुक्यातील केळशी येथील प्रसिद्ध वाळूची टेकडी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र वाळूच्या टेकडीच्या विषयामुळे येथे २२ वर्षापूर्वी होणारा खाडीपूल रखडला. याबाबत आता राज्य शासन आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे केळशी आणि वेळास परिसराचा विकास जवळपास २२ वर्षे पाठिमागे गेल्याची खंत पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे. यामुळे वाळूच्या टेकडीच्या नादात केळशी आणि वेळास परिसराचा विकास रखडल्याने दोन्ही बाजूने नुकसान झाले आहे.
केळशी गावातून जाणार्या सागरी महामार्गासाठी केळशी खाडीवर बांधण्यात येणार्या पुलाचा केळशीकडील भाग वाळूच्या टेकडीवर जोडणार होते. सन २००२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाळूच्या टेकडीवर सपाटीकरण करून पुलाचे खांबही उभे केले गेले होते. त्याच दरम्यान वाळूच्या टेकडीच्या भूगर्भात घरांचे अवशेष, भांडी, विहीर व नाणी सापडायला लागली. ही माहिती पुणे येथील पुरातत्व विभागाला कोणीतरी कळवली. त्यावेळी त्या विभागातील अशोक मराठे आणि त्यांच पथक केळशी येथे दाखल झाले. यानंतर टेकडी परिसरात संशोधन करण्यास सुरूवात केली.
या पथकाने संशोधन करून काढलेल्या निष्कर्षामध्ये वाळूच्या टेकडीखाली वस्ती होती. आताचा समुद्र अर्धा कि.मी. पेक्षा जास्त पाठिमागे होता. १६ व्या शतकात आलेल्या त्सुनामीमुळे सदरची घरे गाडली गेली आणि त्या ठिकाणी वाळूची टेकडी तयार झाली. पुरातन ठेवा म्हणून पुरातत्व विभागाने टेकडीवरील रस्त्याच्या कामावर आव्हान याचिना दाखल करून स्थगिती आणली. स्थगिती आणल्यामुळे पुलाचा पूर्ण आराखडाच बदला. पुलासाठी उभारलेले खांब आणि त्यावर टाकलेल्या स्लॅबचा करोडो रुपयांचा खर्च वाया गेला.www.konkantoday.com




