
कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था
रत्नागिरी: मुंबईतून कोकणात जाणार्या गणेशभक्तांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातून जाणार्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता खालील मार्गानी प्रवास करावा.
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-पळस्पे फाटा (एनएच ४८) येथून जाणार्या वाहनांनी कळंबोली-पनवेल बायपास डी. पॉंईंट-करंजाळे टोलनाका-पळस्पे फाटा या मार्गाचा वापर करावा. तसेच कळंबोली-वाकण (६७.५ कि.मी) मार्गावरून जाणार्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे खोपोली पाला-वाकण या मार्गाचा वापर करावा. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या भागात गणेशोत्सवादरम्यान सोडण्यात येणार्या जादा बसेस, वाहने व त्यामुळे होणारी वाहतुक कोंडी पाहता खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-चिपळूण मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (एनएच ४)सातारा-उंब्रज-पाटण- कोयना नगर-कुंभार्ली घाट-खेर्डी -चिपळूण या मार्गाचा वापर करावा. कळंबोली-हातखंबा मार्गाऐवजी मुंबई-पुणे- एक्स्प्रेस वे (एनएच ४), सातारा-कराड -वाठार-टोप उजवीकडे वळण घेवून मलकापूर- शाहुवाडी -आंबा घाट- साखरपा हातखंबा या रस्त्याने जावे.
www.konkantoday.com