
मित्र पक्षांनी सन्मानाची वागणूक न दिल्यास जि.प.व पं. स.निवडणुका स्वबळावर लढण्याचा रिपब्लिकन (आठवले) पक्षाचा निर्धार
नियोजन मंडळ, शासकीय समित्या किंवा शासकीय कमिट्या यावर रिपब्लिकन (आठवले) या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाणून बुजून डावलले जात आहे. शासकीय निधीबाबतही तीच अवस्था आहे. यापुढे असे घडत राहिले आणि महायुतीच्या मित्रपक्षांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक न दिल्यास आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार, असा ठाम निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या गुहागर तालुका बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.
गुहागर येथील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची गुहागर तालुक्याची बैठक तालुकाध्यक्ष संदीप कदम (रानवी) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात झाली. यावेळी नियोजन मंडळ, शासकीय कमिट्या किंवा शासकीय समित्या यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाणून बुजून डावडले जात आहे. महायुतीच्या मित्रपक्षांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना यापुढे सन्मानाची वागणूक न दिल्यास स्वबळावर लढण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला.
या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा ३ ऑक्टोबर रोजी क्रांतीभूमी महाड येथे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमाला जाण्यासाठी महिला, पुरुष कार्यकर्ते आणि सभासदांचे तसेच गाड्यांचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची सभासद मोहीम आक्रमकपणे वाढवण्याच्या दृष्टीने विभागात, गावा-गावात, वाडी-वाडीत बैठका घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचे ठरले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आप्पा कदम (आबलोली), तालुकाध्यक्ष संदीप कदम (रानवी) यांनी जिल्ह्याच्या बैठकीत झालेली चर्चा सभागृहात सांगितली. यावर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेऊन एकमुखी निर्धार करण्यात आला.
या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप कदम, जिल्हा उपाध्यक्ष आप्पा कदम, युवकचे तालुकाध्यक्ष विजय असगोलकर (असगोली), तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव (वेळंब), सरचिटणीस सुनील गमरे (जामसूत), सरचिटणीस चंद्रकांत मोहिते (पवार साखरी), सरचिटणीस दशरथ पवार (असगोली), कोषाध्यक्ष दीपक गमरे (पालपेणे), प्रवक्ते शशिकांत जाधव (वरवेली), तालुका संघटक भीमसेन सावंत (गुहागर), शंकर मोहिते (कोतळूक), सचिन मोहिते (पवार साखरी), आयटी सेलचे तालुकाध्यक्ष संदेश कदम (आबलोली) आदी कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरचिटणीस सुनील गमरे यांनी केले.




