
आरोग्य अभियान कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन, आरोग्य यंत्रणेवर विपरित परिणाम
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी १९ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ५५० हून अधिक कर्मचारी कार्यरत नसल्याने आरोग्य सेवेसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. २०२४ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे हंगामी कर्मचार्यांना सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करावी ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे.
जिल्ह्यातील समन्वयक राकेश तोडणकर यांनी माहिती देताना सांगितले १४ मार्च २०२४ रोजी एक शासन निर्णय काढण्यात आला. त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणार्या कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा समावेशनाला राज्य सरकारने मान्यता दिली. १० वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचार्यांचे पूर्ण समावेश करण्यात येईल आणि प्रत्येक वर्षी ३० टक्के याप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग व नगर विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात समावेश करण्याविषयी तरतूदी करण्यात आल्या. सार्वजनिक आरोग्य सेवेशी जोडलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध केडरचे कर्मचारी समाविष्ट आहेत. एकूण १४ प्रकारच्या संघटना कंत्राटी लोकांना सेवेत समाविष्ट करण्याबद्दल आग्रही आहेत. या संघटनांनी एक महासंघ तयार केला आहे. या महासंघातर्फे आम्ही आंदोलन करत आहोत.www.konkantoday.com




