
कवींनो! कवितेची गाजलेली ओळ सद्यस्थितीतील अभिव्यक्तीत मांडा
‘चिपळूण मसाप आणि चिपळूण कोमसाप’चा पुढाकार ;
‘गणपत वाणी बिडी पिताना’वर ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव
स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा
चिपळूण :: येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव स्वरुपाची ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ ‘राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींना लेखनासाठी बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाणी’ या कवितेतील पहिलीच ओळ “गणपत वाणी बिडी पिताना” देण्यात आली आहे. आजवरच्या साहित्य इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच क्रियाशील प्रयोग असल्याने राज्यभरातील कवींमध्ये यास्पर्धेबाबत उत्सुकता आहे.
एखाद्या सर्वज्ञात कविच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन त्याच्या मूळ कवितेपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या अभिव्यक्तीची कविता निर्माण करून त्यातून सद्यस्थितीची विविधांगी मांडणी करणे आणि त्यातून चर्चित, अचर्चित समाज वास्तवाला भिडणे असे या संकल्पनेचे स्पर्धा स्वरूप आहे. “गणपत वाणी बिडी पिताना”ही ओळ स्पर्धेसाठी सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक कवितेत किमान एकदा तरी येणे अपेक्षित आहे. काव्यलेखक स्पर्धकाने कवितेच्या सुरुवातीला ही ओळ वापरणे अधिक कसदार मानण्यात येईल. या ओळीशिवाय या कवितेमधील इतर दुसऱ्या कोणत्याही ओळीवर किंवा मर्ढेकरांच्या इतर कवितेवर किंवा इतर कवीच्या कोणत्याची कवितेवर केलेले संस्करण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. नवीन तयार होणाऱ्या कवितेतील अभिव्यक्ती मूळ कवितेपासून जितकी दूर जाईल तितकी ती यशाच्या अधिक जवळ जाईल, असा या संकल्पनेमागील विचार आहे. मूळ कवितेच्या ढाच्याला, आशयाला, शब्दांना आणि विषयाला या नव्या रचनेने अधिक कलासक्त वैचारिक बैठकीने कलाटणी द्यावी. वर्तमानाचे संदर्भ, नाविन्य, डौल, आशयाची घनता या गोष्टींचेही भान राखावे असा एकंदरीत विचार या स्पर्धेच्या आयोजनामागे आहे. या स्पर्धेसाठी मूळ कवितेचे विडंबन तसेच कोणत्याही अन्य प्रकारची कविता वरील मुद्द्यांच्या आधारे स्पर्धेस पात्र राहिल.
या स्पर्धेसाठी अपेक्षित काव्य अभिव्यक्ती कशाप्रकारे साकार होईल, याची काही उदाहरणे…
गणपत वाणी बिडी पिताना
स्वत:तून वजा झाल्यासारखा
शून्यात पाहात राहीला
उर्ध्वगामी जात नष्ट होणाऱ्या
धुम्रवलयांकडे.
भयकंपीत चेहऱ्याने पाहात राहीला
त्याच्या पोराने फ्लिपकार्ट वरुन
मागवलेल्या डझनभर वस्तूंकडे.
किंवा
गणपत वाणी बिडी पिताना
आडोशाला व्यथा आंधळी
सावरीत जी उभी कधीची
गलितगात्र खांद्यावर झोळी
गहन धुराचा ढीग साचला
भवतालावर-फडतालावर
उगाच वटवाघूळ फडफडते
धुरकटल्या काळ्या आढ्यावर.
किंवा
गणपत वाणी बिडी पिताना
शोधायाचा जात आपुली
विरत जाणाऱ्या धुरामधूनी
आणि शिल्लक थोटूक निरखत
उमजून घ्यायचा पत आपुली.
या अभिनव स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक : रु ५,०००/- रोख + सरासरी प्रवास खर्च + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह, द्वितीय पारितोषिक : रु ३,०००/- रोख + सरासरी प्रवास खर्च + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह, तृतीय पारितोषिक : रु २,०००/- रोख + सरासरी प्रवास खर्च + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच पाच उत्तेजनार्थ पारितोषिके ही प्रत्येकी रु १,०००/- रोख + सरासरी प्रवास खर्च + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह अशी असणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तीन वेगवेगळ्या प्रांतातून मान्यवर परिक्षक असणार आहेत. परीक्षकांनी कविता तसेच समिक्षा क्षेत्रात आजवर केलेले महत्त्वपूर्ण काम विचारात घेतले जाणार आहे. स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी आपली कविता मोबाईलवर मराठी भाषेत टाईप करून आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि संपूर्ण परिचयासह पाठवावी. एका मोबाईल नंबर वरुन एकच कविता स्विकारण्यात येईल. कविता किती ओळींची असावी याला बंधन नाही. मात्र कविता कवितेएवढ्या लांबी-रुंदीची असावी. या स्पर्धेतील निवडक उत्तम कवितांचा संग्रह पुणे येथील प्रतिथयश प्रकाशन संस्थेकडून छापून आणण्याचा आयोजकांचा मानस आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेसाठी कविता २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठवाव्यात.
या अभिनव स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त कवींनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मसाप शाखा अध्यक्ष संतोष गोनबरे आणि कोमसाप शाखा अध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी आपल्या कविता धीरज वाटेकर (9860360948), दीपक मोने (9767504489), प्राची जोशी (9823521962) यांच्या व्हॉटसअप नंबरवर पाठवावी.