
मागील पाच तासांपासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर समुद्रातच बसून
मुंबईसह संपूर्ण जगभरातील गणेशभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या लालबागचा राजाचे विसर्जन यंदा पार पडू शकलेले नाही.मागील पाच तासांपासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर समुद्रातच बसून असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित व हायड्रोलिक यंत्रणेसह खास तराफा तयार करण्यात आला होता. परंतु, लालबागचा राजाची मूर्ती या तराफ्यावर चढू शकत नसल्याने गेल्या साडेसहा तासांपासून बाप्पा समुद्रातील चार-पाच फूट खोल पाण्यातच स्थिरावले आहेत. दरम्यान, याबाबत आता कोळी बांधवांनी भाष्य केलं असून त्यांनी लालबागचा राजा मंडळावर काही गंभीर आरोप केले आहेत.
विसर्जनाचं कंत्राट गुजरातच्या तराफ्याला, कोळी बांधवांचा गंभीर आरोप
नमस्कार, मी गिरगाव चौपाटीचा नाखवा हिरालाल पांडुरंग वाडकर… आपल्या माध्यमातून बोलत आहे. आज गिरगावमध्ये लालबागच्या राजाचे विसर्जन अजूनही झालेलं नाही. काही कारणांमुळे ओहोटी-भरतीचा अंदाज लालबागचा राजा मंडळाला आलेला नाही. आम्ही वाडकर बंधू बरीच वर्षे झालं लालबागचा राजाचं विसर्जन करत आलो आहोत. आज काही कारणांमुळे लालबागचा राजाचं विसर्जन झालेलं नाही. वाडकर बंधू वर्षानुवर्षे विसर्जन करत होते. आता ते करत नाहीत. कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागचा राजा मंडळाने हे कंत्राट त्यांना दिलं आहे. यापुढे लालबागचा राजा मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यायला हवी, असं गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर म्हणाले आहेत.




