
मणिपूरमध्ये शांतता करार; दोन प्रमुख गटांची स्वाक्षरी, प्रादेशिक अखंडता स्थिरता राखण्यावर भर!
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन प्रमुख कुकी-झो गटांनी सरकारसोबत पुन्हा वाटाघाटी केलेल्या अटी आणि शर्तींवर कारवाया स्थगिती करारावर गुरुवारी स्वाक्षरी केली. या अंतर्गत मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखणे, संवेदनशील भागांपासून शिबिरे स्थलांतरित करणे आणि राज्यात कायमस्वरूपी शांतता व स्थिरता आणण्यावर उपाय शोधण्यासाठी सहमती दर्शविली.
कुकी नॅशनल ऑर्गनाझेशन (केएनओ) आणि युनायटेड पीपल्स फ्रंट (यूपीएफ) यांच्यासोबत कारवाया स्थगिती करारात नव्याने अटी-शर्ती निर्धारित केल्या आहेत. यामुळे मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न सकारात्मक दिशेने जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कुकी-जो कौन्सिलने (केजेसी) मणिपूरहून जाणारा राष्ट्रीय महामार्ग-२ प्रवासी आणि आवश्यक सामग्रीच्या वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णयही घेतला आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी आठवड्यात मणिपूरला भेट देण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार करण्यात आला आहे.
गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि कुकी गटांचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांत बैठकांचे सत्र पार पडल्यावर करारावर स्वाक्षरी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे. मणिपूरमध्ये बहुसंख्याक मैतेई समुदायाला अनुसूचित जातींचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी आदिवासी एकजुटता मोर्चा काढल्यानंतर ३ मे २०२३ रोजी येथे जातीय हिंसाचार उसळला होता.
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यात खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली तीन प्रतिबंधित संघटनांशी संबंधित पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लैरेनकाबी गावात प्रतिबंधित कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (पीपल्स वॉर ग्रुप) दोन सक्रिय सदस्यांना अटक करण्यात आली. युमनम सुरचंद्र सिंग (३५) आणि हाओरोंगबाम टोम्बा मीतेई (२९) अशी त्यांची नावे आहेत, असे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




