
टीईटी अनिवार्य केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांत चिंतचे वातावरण
सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निर्णयामध्ये शासकीय सेवेतील शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण बंधनकारक आहे. पदोन्नती घेतलेल्या शिक्षकांनासुद्धा दोन वर्षात ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. निवृत्तीला ज्या शिक्षकांची ५ वर्षे बाकी आहेत त्यांना यातून सूट मिळाली आहे. जे शिक्षक दोन वर्षात उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीने निवृत्ती देवून प्रचलित निकषानुसार निवृत्तीवेतन व अन्य लाभ देता येतील असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे शिक्षक वर्गात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
या संदर्भात शिक्षक संघटनांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. २००९ साली शिक्षण हक्क कायदा प्रस्तावित झाला. २०१० साली तो लागू झाला. २०११ पासून या कायद्यातील तरतूदीप्रमाणे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली. २०११ पासून सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण करणे आपोआप लागू झाले. तथापि त्यापूर्वी सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांनी आपल्याला टीईटी उत्तीर्ण व्हावे लागेल असा विचार केला नव्हता. कायद्यात तरतूद होती परंतु त्याकडे शिक्षक वर्गाकडून फारसे लक्ष देण्यात आले नाही.
www.konkantoday.com




