
लांजा परिसरात वाहतुकीत नियम तोडणार्यांविरूद्ध कारवाई
लांजा शहरात वाहतूक नियोजन असूनही काही वाहनचालकांनी नियमांचा भंग करून बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने पार्किंग केली तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण केला. अशा नियमभंग करणार्या वाहनचालकांविरूद्ध लांजा पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने कडक कारवाई केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १ ते ३१ ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीत बेशीस्त वाहनचालकांविरूद्ध एकूण ३६६ प्रकरणे दाखल करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल २ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहने रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभे करणे, बेशिस्त वाहन चालवणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकारांवर पोलिसांनी ही मोहीम राबविली. दरम्यान अपघातांचा धोका आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अशी काटेकोर कारवाई पोलीस करत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पोलिसांच्यावतीने वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून नियमभंग करणार्याविरूद्ध पुढील काळातही अशाचप्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सांगितले.
www.konkantoday.com




