
पेढांबे-अलोरे पुलावरील अवजड वाहतूक बंद
पिंपळी येथून पूल खचल्यानंतर खडपोली एमआयडीसीसह दसपटीचा संपर्क तुटल्यानंतर वळसा मारून पेढांबे-खडपोली या पर्यायी मार्गाचा वापर सुरू झाला होता. मात्र आता या मार्गावर असलेल्या पेढांबे नदीच्या पुलावरील अवजड वाहतूक बंद करत केवळ हलक्या वाहनांसाठी पूल खुला ठेवल्याने परिसरातील नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. दरम्यान, या पुलाच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर झालेला असून त्याची निविदास्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपळी-नांदिवसे मुख्य मार्गावरील नदीवरचा पूल दोन आठवड्यापूर्वी खचल्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला त्यामुळे दसपटी भागाकडे जाणारे प्रवासी ३४ कि.मी.चा लांब प्रवास करून पेढांबे-खडपोलीमार्गे दसपटीकडे जातात. यासाठी त्यांना पेढांबे पुलावरून जावे लागत आहे. हा पूल अरूंद आहे. त्याचे बांधकाम ६५ वर्षापूर्वी करण्यात आले आहे. मात्र शासनाकडून निधीचे कारण देत या पुलाची दुरूस्ती रखडली होती. आता या पुलासाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून ५ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर होवून पुढील कार्यवाही निविदास्तरावर आहे. मात्र अद्याप निविदा निघालेली नाही.www.konkantoday.com




