
भर बाजारपेठेत झाडाची फांदी कोसळली दुचाकीस्वार बचावला
चिपळूण तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त येथील बाजारपेठेत गर्दी असतानाच कारेकर यांच्या इमारतीसमोरील मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या धोकादायक झाडाची भलीमोठी फांदी अचानक खाली कोसळून ती थेट एका मोटारसायकलस्वाराच्या अंगावर पडली. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र त्या युवकाचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेनंतर बाजारपेठेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या आवाजासह कोसळलेली फांदी रस्त्यावर आडवी पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
या झाडाच्या धोकादायक अवस्थेबाबत अनेकदा स्थानिकांनी नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उपडल्या असून नगर पालिका प्रशासन कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
www.konkantoday.com




