
सुप्रिया सुळेंच्या गाडीला मराठा आंदोलकांचा घेराव; शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी!
Supriya Sule : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू आहे. आज (३१ ऑगस्ट) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाला अनेक राजकीय नेते भेटी देत आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाला भेट देत मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच भेटीनंतर सुप्रिया सुळे पुन्हा परत जात असताना त्यांची गाडी आंदोलकांनी आडवली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांनी घेराव घालत गाडी पुढे जाऊ देण्यास नकार दिला आणि शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, काही वृत्तवाहिन्यांवर गाडी अडविण्याचे दृश्य दिसत असताना काही कार्यकर्ते शरद पवारांच्या विरोधात घोषणा देत असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सुप्रिया सुळे यांच्या गाडीला रस्ता करून दिला आणि सुप्रिया सुळे या त्या ठिकाणाहून रवाना झाल्या. मात्र, यावेळी काही आंदोलकांनी पाण्याची बाटलीही फिरकवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्यामुळे काहीवेळ मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.




