
मुंबई–गोवा महामार्ग : १७ वर्षांचा मृत्यूमार्ग, न्यायासाठी जनआक्रोश समितीचा पाठपुरावा
मुंबई–गोवा महामार्गावर मागील १७ वर्षांत हजारो निष्पाप जीव गमावले गेले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, कित्येक कुटुंबे उध्वस्त झाली. या अपघातग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा, मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत मिळावी तसेच जखमींना त्यांच्या पुढील जीवनाचा गाडा स्थिर करण्यासाठी भरघोस आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती सातत्याने प्रयत्नशील आहे.
याच उद्देशाने पळस्पे ते झाराप या दरम्यान घडलेल्या अपघातांची माहिती समितीकडून गोळा करण्यात येत आहे. आज पेण पोलीस ठाण्यात समितीचे पदाधिकारी आवश्यक माहिती घेण्यासाठी उपस्थित होते.
अपघातांमुळे निर्माण झालेली ही मानवी शोकांतिका केवळ रस्त्याच्या कामातील ढिलाई, प्रशासनाची बेफिकिरी आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे घडली आहे. समितीने शासनास स्पष्ट मागणी केली आहे की, अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत व न्याय मिळालाच पाहिजे.




