
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचीपंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना
रत्नागिरी, दि. २९ ):- जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा प्रवेश न घेतलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी) घटकातील इयत्ता बारावी नंतरच्या अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) या अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ करीता लाभाची रक्कम पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेद्वारे देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
अटी व निकष पूर्ण करणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज १ ते १८ सप्टेंबर २०२५ रोजी प्रर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण, कुवारबांव रत्नागिरी यांचेकडे जमा करावयाची आहे. सदर योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २५ हजार रुपये, निवास भत्ता १२ हजार रुपये, निर्वाह भत्ता ६ हजार रुपये असे प्रति विद्यार्थी एकूण ४३ हजार रुपये रक्कम अनुज्ञेय आहे. तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २३ हजार रुपये, निवास भत्ता १० हजार रुपये, निर्वाह भत्ता ५ हजार रुपये असे प्रति विद्यार्थी एकूण ३८ हजार रुपये रक्कम अनुज्ञेय आहे.
योजनेच्या पात्रतेसाठी विद्यार्थी हा इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा असावा. (भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी). विद्यार्थी हा स्थानिक रहिवाशी नसावा. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या / तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे ४० टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबत प्रमाणपत्र अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारापेक्षा जास्त नसावे. (तहसिलदार यांचेकडील उत्पन्न दाखला) बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/सीजीपीए गुण असणे आवश्यक राहील. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.
योजनेसाठी इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या किंवा शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांचा निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्यांची निवड गुणवतेच्या आधारे करण्यात येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील. त्याला दिलेल्या रक्कमेची १२ टक्के व्याजासह वसुली केली जाईल.




