
चौपाट्यांवर विसर्जनावेळी सावधान, स्टिंग रे आणि ब्लु जेलीफीशपासून सर्तक राहण्याचे नागरिकांना आवाहन
गणेशमूर्ती विसर्जनाच्या करताना समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई महानगर पालिकेने सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात या मोसमात मुंबईतील गिरगाव, जुहू आणि वसोर्वा अशा चौपाट्यांवर विसर्जनावेळी ब्लू बटन जेलीफीश, स्टिंग रे अशा प्रजातीच्या माशांचा दंश होण्याची शक्यता असते.त्यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे हा सण साजरा करावा आणि खोल पाण्यात उतरु नये असे आवाहन देखील पालिकेने केले आहे.
मुंबईच्या समुद्र किनारी ब्ल्यू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे प्रजातीच्या माशांच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. गणेश विसर्जनादरम्यान ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासोबतच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत.
समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत सावध
मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ब्लू बटन जेलीफीश, स्टिंग रे प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात पालिकेने मत्स्यव्यवसाय विभागाला विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर असतो आणि नागरिकांना मत्स्यदंश होऊ शकतो. यापासून बचावासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती महानगरपालिकेने केली आहे.