
विरारमध्ये इमारतीचा चौथा मजला कोसळला, तिघांचा मृत्यू; २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
विरार पूर्वेकडील विजय नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका चार मजली इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आई-वडील आणि त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.अजूनही २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा केल्यानंतर काही तासांतच काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
विरार पूर्वेच्या नारिंगी परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीत मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. इमारतीच्या चौथ्या मजल्यापासूनचा स्लॅबसह मोठा भाग खचला आणि थेट खाली असलेल्या चाळींवर कोसळला. या इमारतीत सुमारे ३० ते ३५ कुटुंबे वास्तव्यास होती. रात्रीची वेळ असल्याने बहुतेक रहिवासी घरातच होते, ज्यामुळे गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. इमारतीचा ढिगारा बाजूच्या चाळीवर पडल्याने तेथील नागरिकही जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, वसई-विरार महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून आठ ते नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी, अजूनही काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.