
डोंबिवलीत गणेश मूर्तींचे अपुरे काम ठेवून गणेशमूर्तीकार पळाला. गणेशभक्त संतापले
मागील तीन महिन्यापासून डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावर चिनार मैदानाच्या बाजुला दत्त मंदिरासमोर आनंदी कला निकेतन नावाने गणेशमूर्तीकार प्रफुल्ल तांबडे यांनी गणपती मूर्ती तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता.घरगुती गणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या गणपतीच्या कारखान्यात तीन महिन्यापूर्वी प्राणप्रतिष्ठेच्या गणेश मूर्तीची आगाऊ नोंदणी केली होती. सोमवारी रात्रीपासून गणेशमूर्तीकार प्रफुल्ल तांबडे कारखान्यातून गणेशभक्तांना कोणतीही पूर्वसूचना न देता पळून गेला आहे आणि त्यांचा मोबाईलही बंद लागत असल्याने गणेश भक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मागील तीन महिन्यापासून कारखान्यात गणेशमूर्तीकार तांबडे यांच्यासह कारागिर मूर्ती तयार करत असल्याचे काही मूर्तींचे रंगकाम सुरू असल्याचे गणेशभक्त पाहत होते. नोंदणी केलेल्या गणेशभक्तांकडून निम्म किंवा काहींकडून पूर्ण रकमा गणेशमूर्तीकार तांबडे यांंनी स्वीकारल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
गणेशोत्सव जवळ आला म्हणून आनंदी कला केंद्रात नोंदणी केलेल्या गणेशभक्तांनी आमचा गणपती तयार आहे ना. आम्ही एक दिवस, दोन दिवस अगोदरच मूर्ती घेण्यास येतो असे मूर्तीकार तांबडे यांना सांगण्यास सुरूवात केली होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आमची गणेशमूर्ती आम्हाला लवकर न्यायची आहे त्यासाठी तुम्ही लवकर रंगकाम करा म्हणून तांंबडे यांच्यामागे तगादा लावून होते. मी तुम्हाला गणपतीपूर्वी मूर्तींचा ताबा देतो असे आश्वासन तांबडे गणेशभक्तांना देत होते.सोमवारी संध्याकाळपासून गणेश भक्त फुले रस्त्यावरील आनंदी कला निकेतनमध्ये गणपतीची मूर्ती घेण्यास जाऊ लागले. त्यावेळी तेथे गणेशमूर्तीकार तांबडे नव्हते. तसेच त्यांचे सहकारी कारागिरही आढळून आले नाहीत. नागरिकांनी तांबडे यांना मोबाईलवर संपर्क केला. त्यांचा मोबाईल बंद येत आहे. गणपतीच्या कारखान्यात गणपतीचे रंगकाम बाकी असताना आणि अनेक मूर्ती रचायच्या बाकी असताना मूर्तीकार गेला कोठे म्हणून गणेशभक्त कारखान्यात जमू लागले. सोमवारी रात्री साडे आठ पासून ते उशिरापर्यंत भाविक मूर्तीकार तांबडे यांची वाट पाहत होते. पण ते कोठेही आढळून आले नाहीत. ते मोबाईल बंद करून बसले आहेत.
त्यामुळे ते मूर्ती वेळेत देऊ शकत नसल्याने पळून गेले असण्याचा संशय भाविकांना आला. मंगळवारी सकाळीच अनेक भाविक आनंदी कला केंद्रात आले त्यावेळीही मूर्तीकार किंवा कारागिर आढळून आले नाहीत. अखेर गणेशभक्तांना आयत्या वेळी कोठून मूर्ती आणायची असा प्रश्न पडला. अखेर संतप्त भाविकांनी आनंदी कला केंद्रातील अन्य कोणी नोंदणी केलेली आणि हाती लागेल ती रंगकाम केलेली मूर्ती उचलून नेणे पसंत केले.
आपली गणेशमूर्ती कारखान्यात तयार होती. ती नेण्यासाठी ग्राहक मंगळवारी सकाळी कारखान्यात आले. त्यावेळी त्यांना मूर्ती गायब असल्याचे आणि ती अन्य भक्ताने रागाच्या भरात नेली असल्याचे समजले. त्यामुळे कारखान्यात अराजकाची परिस्थिती होती. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तींचा प्रश्न निर्माण झाला आहे. आयत्यावेळी आपणास कोण मूर्ती देईल, या चिंतेने मंडळ पदाधिकारी ग्रासले आहेत.