
चिपळूण तालुक्यातील गाणे राजवाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज
दोन दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातील गाणे राजवाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू विषबाधेतून झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे; मात्र याबाबतचा अंतिम अहवाल राखून ठेवण्यात आला असून, व्हिसेरा अहवालानंतरच मृत्यूचे कारण उघड होणार आहे. दुसरीकडे पोलिस यंत्रणेने या प्रकरणाची कसून चौकशी सुरूच ठेवली आहे.
मंगल मनोहर वाघे (१५) आणि सुप्रिया यशवंत वाघे (१४) या दोन्ही बहिणी शेळ्यांना चारून घरी आल्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. एकाच ठिकाणी दोघीही मृतावस्थेत आढळल्याने तिच्या कुटुंबीयांना तसेच ग्रामस्थांनाही तितकाच मोठा धक्का बसला. या घटनेनंतर तत्काळ दोघींचे मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेऊन विच्छेदन करण्यात आले. त्यानुसार प्राप्त झालेल्या प्राथमिक वैद्यकीय अहवालात दोघींचाही मृत्यू विषबाधेतून झाल्याचे उघड झाले आहे; परंतु याबाबतचा अंतिम अहवाल राखून ठेवण्यात आला आहे.




