
देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजप अर्धवट ज्ञानी, त्यांचा गुडघ्यातही मेंदू नाही; राऊत बोलता-बोलता बरंच बोलले!
मुंबई : काही दिवसांपूर्वी सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं या मुद्द्यावरून भाजपला घेरल्यानंतर काल राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला. “जावेद मियाँदाद या क्रिकेटरला जेवायला बोलवणाऱ्यांनी या विषयावर बोलू नये,” असं फडणवीस म्हणाले.
फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी आज संताप व्यक्त करत भाजपचा आक्रमक शब्दांत समाचार घेतला आहे.
“देवेंद्र फडणवीस अर्धवट ज्ञानी आहेत. मुळात संपूर्ण भाजप हाच अर्धवट ज्ञानी आहे. भाजपवाल्यांच्या गुडघ्यातही मेंदू नाही. जावेद मियाँदाद मातोश्रीवर काय बोलले, हे दिलीप वेंगसरकर यांना विचारा. पैशासाठी भाजपने पाकड्यांसमोर शेपूट घातली आहे,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांना उत्तर देताना संजय राऊत पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे चित्रपट पाहायला हवा. त्यावेळीच्या मुलाखती समजून घ्यायला हव्यात. जावेद मियाँदाद हे बाळासाहेबांना भेटायला आले होते. भारत-पाकिस्तान क्रिकेटला विरोध करू नका, असं ते सांगणार होते. पण बाळासाहेबांनी त्यांना चहा घ्यायला सांगितला आणि परत पाठवले. दहशतवाद आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी एकत्र चालणार नाही, असं बाळासाहेब त्यांना म्हणाले होते,” अशी आठवण राऊत यांनी करून दिली आहे.
“बाळासाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे शेपूट घातली नव्हती. जर तुम्हाला कुंकवाची कदर असेल, तर अशी विधाने करू नका,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.
दरम्यान, “तुम्ही आरशाची फॅक्टरी सुरू केली आहे. पण त्यामध्ये तुम्हाला तुमचे खरे रूप दिसेल. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास तुमचा पाठिंबा आहे की नाही? पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली,” असा आरोप संजय राऊतांनी भाजपवर केला आहे.