
‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणे देशद्रोह नाही; हायकोर्टाचा मोठा निर्णय!
शिमला : सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे कॅप्शन देऊन शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पाओंटा साहिब येथील फेरीवाला सुलेमान याला हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. केवळ ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे शब्द उच्चारणे किंवा लिहिणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
न्यायमूर्ती राकेश कैंथला यांनी मंगळवारी हा निकाल दिला. आरोपीच्या कृत्यामुळे भारत सरकारविरोधात द्वेष, असंतोष किंवा फुटीरतावादी प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळाल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. “केवळ ‘पाकिस्तान जिंदाबाद’ या शब्दांमुळे देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध होत नाही, कारण त्यातून सशस्त्र बंडखोरी किंवा विध्वंसक व फुटीरतावादी कारवायांना चिथावणी मिळत नाही,” असे न्यायालयाने म्हटले आहे. “या पोस्टमुळे कायद्याने स्थापित सरकारबद्दल द्वेष किंवा असंतोष निर्माण झाला, असा कोणताही उल्लेख तक्रारीत नाही. पोस्टमध्ये केवळ ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे शब्द होते. आपल्या मातृभूमीचा अपमान न करता दुसऱ्या देशाचा जयजयकार करणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरत नाही. त्यामुळे, प्रथमदर्शनी, याचिकाकर्त्याला या गुन्ह्याशी जोडण्यासाठी पुरेसा पुरावा नाही,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील पाओंटा साहिब पोलीस ठाण्यात २७ मे रोजी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुलेमानने फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट केली होती, जी प्रक्षोभक आणि राष्ट्रहिताच्या विरोधात असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र, बचाव पक्षाने न्यायालयात वेगळाच युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, सुलेमान हा एक निरक्षर फळविक्रेता असून, तो सोशल मीडिया वापरत नाही किंवा त्याला त्याचे कार्य कसे चालते हेही समजत नाही. त्याच्या मुलाने त्याचे फेसबुक खाते तयार केले होते. या प्रकरणातील तक्रारदाराकडेच सुलेमानच्या फोनचा ॲक्सेस होता आणि त्यानेच ही रील पोस्ट केली असावी, असा आरोप बचाव पक्षाने केला. तसेच, सुलेमान आणि तक्रारदार यांच्यात पैशांवरून वाद असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
अतिरिक्त महाधिवक्ता लोकेंद्र कुटलेरिया यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडताना आरोपीच्या जामिनाला विरोध केला. ते म्हणाले, “ज्यावेळी ही पोस्ट शेअर करण्यात आली, तेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण होते. अशा परिस्थितीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ लिहिणे हे राष्ट्रविरोधी कृत्य आहे. त्यामुळे, जामीन अर्ज फेटाळण्यात यावा.” बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, याचिकाकर्ता ८ जून रोजी पोलिसांत हजार झाला तेव्हापासून तो कोठडीत आहे. त्याचा मोबाईल फोन जप्त करून जुंगा येथील राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (SFSL) पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पोलीस कोठडीची गरज नाही. पोलिसांनी ६ ऑगस्ट रोजी सुलेमानविरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे.