मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नासाठी तरुणाची सत्याग्रह पदयात्रा.रस्त्याचा आढावा घेत, गोव्याच्या दिशेने चालत निघाला.

अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली १५ वर्ष रखडले आहे. अजूनही हे काम मार्गी लागण्याची चिन्ह दिसत नाहीत. देशभरात महामार्गांचे जाळे विणणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी या महामार्गाचे काम मार्गी लावू शकलेले नाही. महामार्गाच्या कामाची संथगतीकडे शासनाचे लक्ष्यवेधण्यासाठी पेण मधील युवकाने सत्याग्रह यात्रेला सुरवात केली आहे. २०० किलोमीटरच अंतर चालत पार करून तो आला रत्नागिरीत दाखल झाला आहे.

गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील चाकरमान्यांना कोकणचे वेध लागले आहे. शनिवार पासून मुंबईतील लाखो गणेशभक्तांचा कोकणच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. मात्र यावर्षीही त्यांची कोकणची वाट खडतर राहणार आहे. २०११ साली सुरू झालेले महामार्गाचे काम २०२५ संपत आले तरी पूर्ण झालेले नाही. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यामुळे यंदाही कोकणातील आपले गाव गाठण्यासाठी गणेशभक्तांना मोठी कसरत करावी लागणार आहे. म्हणूनच महामार्गाच्या या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष्यवेधण्यासाठी पेणच्या तरुणाने सत्याग्रह यात्रा सुरू केली आहे.

महामार्गाच्या प्रश्नाबाबत जनसामन्यात जागृती निर्माण व्हावी, महामार्गावरील धोकादायक वळणे, अपघात स्थळे, अपूर्ण कामे, खड्डे यांची पहाणी करावी, झालेल्या कामांमधील त्रृटी जाणून घ्याव्या आणि नंतर त्याबाबत शासनाला वस्तूनिष्ठ अहवाल सादर करावा यासाठी ही सत्याग्रह यात्रा सुरु केली आहे. पेण येथे राहणारा चैतन्य पाटील हा व्यवसायाने अभियंता आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन तो महामार्गाची इथंभूत माहिती तो शासनाला सादर करणार आहे. जिपीएस प्रणालीचा वापर करून तो तिथले फोटो आणि त्रृटी सध्या महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला पाठवतो आहे.

९ ऑगस्ट पासून ही यात्रा सुरू सुरु केली. पनवेल पासून दररोज २० किलोमीटर चालत तो आता रत्नागिरीच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे त्याला ही पदयात्रा थांबवावी लागली आहे. मात्र दोन दिवसात तो पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला सुरवात करणार आहे. गेल्या काही वर्षात मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात १ हजारहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अपघातात मृत्यूमूखी पडणाऱ्यांची संख्या हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे हे अपघात नेमके का होतात, त्यामागील कारणे कोणती याचाही शोध घेण्याचा प्रयत्न चैतन्य करत आहे.

दहा दिवसाच्या सत्याग्रह यात्रे त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव आणि रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी त्यांनीही त्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा आणि त्यामागील कारणांचाही त्याने या पदयात्रे दरम्यान अभ्यास केला आहे. सर्व माहिती संकलित करून महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि जिल्हाधिकारी यांना सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button