
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचार्यांनी पाण्यातून पोहत जावून तांत्रिक बिघाड दूर केला, कर्मचार्यांचे कौतूक.
गेले दोन दिवस पडणार्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. महावितरण कर्मचार्यांनी पुराच्या पाण्यातून पोहत जात संगमेश्वर तालुक्याला वीज पुरवठा करणार्या निवळीतील वाहिनीमधील तांत्रिक बिघाड दुरूस्त केला.
महावितरणच्या संगमेश्वर उपकेंद्राला निवळी व आरवली अशा दोन उपकेंद्रातून ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जातो. या वीज वाहिनीवरून संगमेश्वर उपकेंद्रासह देवरूख, साडवली व साखरपा अशी इतर तीन उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांमध्ये सुमारे ६० हजार वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. १७ ऑगस्ट रोजी निवळी व आरवली या दोन्ही वाहिन्यांवर बिघाड होवून वीज पुरवठा खंडीत झाला. अथक प्रयत्नानंतर १८ रोजी आरवली उपकेंद्रातून येणारी वाहिनी दुरूस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला.
त्यानंतर निवळी वीज वाहिनीवरील बिघाड शोधण्यात आला. हा बिघाड वांद्री मानसकोंड येथील एका खांबावर आढळला. सोनवीच्या पात्रात हा खांब असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचणे आव्हानात्मक होते. परंतु बोट उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्याने महावितरणच्या जनमित्रांनी स्वतःच खोल पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. महावितरणचे जिगरबाज जनमित्र विलीन काष्टे, प्रतीक तांबे, किरण मोरे, रूपेश, फेपडे, सचिन कुंभार यांनी लाईन फोरमन विजय आडविलकर यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण मोहीम पूर्ण केली. यासाठी कनिष्ठ अभियंता योगीनाथ गोरे, सहाय्यक अभियंता फारूख गवंडी व उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार यांचे मार्गदर्शन लाभले.www.konkantoday.com