
मुथूट फायनान्समध्ये तब्बल २६ लाखांचा घोटाळा; लांजा शाखा व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा
मुथूट फायनान्स लिमिटेडच्या लांजा शाखेत तब्बल २६ लाख ८१ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शाखा व्यवस्थापकासह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही फसवणूक २४ जून २०२४ ते ५ मे २०२५ या कालावधीत केल्याचे समोर आले आहे. याबाबत कंपनीचे क्लस्टर मॅनेजर संजय चुडाजी राऊळ (४४) यांनी लांजा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
आरोपींनी संगनमताने खातेदारांनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये फेरफार करत २७३.७ ग्रॅम सोन्याचा अपहार केला. या सोन्याची किंमत २३ लाख ९६ हजार रुपये असून, याशिवाय कंपनीची परवानगी न घेता साक्षीदार कांता कमलाकर कुरुप यांना दागिन्यांच्या बदल्यात २ लाख ८५ हजार रुपये देण्यात आले. या सर्व प्रकारामुळे कंपनीची एकूण २६ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ४१६ (१), ४१८ (४) आणि ४२१ (१) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयितांमध्ये शाखा व्यवस्थापक सुनील तुकाराम गुरव (५४), प्रसाद सीताराम रामाणे (२८), सुशांत सुनील धाडवे (२७), ओंकार दिवाकर थारळी (२६) आणि तुषार गजानन वाडेकर (२७) यांचा समावेश आहे. या घोटाळ्यामुळे वित्तीय क्षेत्रात खळबळ उडाली असून पुढील तपास लांजा पोलिस करीत आहेत.




