
तालुकास्तरीय अॅनिमिया नियंत्रण प्रकल्पाचे भव्य उद्घाटन

रत्नागिरी : जिल्ह्यातील महिलांमध्ये आणि बालकांमध्ये वाढत्या रक्तक्षयाच्या समस्येवर मात करण्यासाठी तालुकास्तरीय “अॅनिमिया नियंत्रण प्रकल्पाचे उद्घाटन”उत्साहात पार पडले.
या उपक्रमाचे आयोजन श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर (SRHRC) धरमपूर, जि. वलसाड (गुजरात) आणि स्वयंपूर्तता फाऊंडेशन, रत्नागिरी यांच्या वतीने, जिल्हा परिषद रत्नागिरी व आरोग्य विभाग रत्नागिरी यांच्या सहकार्याने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदेही रानडे होत्या. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे प्रोग्राम डायरेक्टर विरेन गांधी, स्वयंपूर्तता फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. दीपिका रांबाडे, स्वयंपूर्तता फाऊंडेशनचे सचिव युयुत्सु आर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या, “प्रत्येकाने आपल्या परसबागेतून लोहयुक्त हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात केला, तर रक्तक्षयाचे प्रमाण निश्चितच कमी होईल. हा प्रकल्प आपल्या मनातील आहे.,”
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी रत्नागिरी जिल्ह्यात महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण जास्त असून, या प्रकल्पामुळे महिलांना आणि मुलांना मोठा फायदा होईल, असे सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव यांनी रक्तक्षयावरील माहिती आणि त्यावरील उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी जिल्ह्यातील उपस्थित महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. कमी हिमोग्लोबिन असलेल्या महिलांना औषधोपचार आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.
महिलांमधील व बालकांमधील अॅनिमिया कमी करण्यासाठी जनजागृती करणे, आरोग्य तपासणी, लोहयुक्त आहाराबाबत मार्गदर्शन आणि औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देणे ही या प्रकल्पाची उद्दिष्टे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.




