
पं. आमोद दंडगे शिष्य परिवारा तर्फे उद्या रत्नागिरीत “गुरुवंदना” कार्यक्रम
रत्नागिरी : पं. आमोद दंडगे शिष्य परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरीत उद्या (१७ ऑगस्ट) गुरुवंदना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात तबला विद्यार्थ्यांचा संगीत आविष्कार पाहण्याची संधी संगीतप्रेमींना मिळणार आहे. हा कार्यक्रम उद्या सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित केला असून, सायंकाळी ४ वाजता गुरुपूजन सोहळा होणार आहे.
पं. आमोद दंडगे यांचा शिष्य परिवार मोठा असून, गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते. यंदा या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गुरुजींचे मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर, सांगली येथील विद्यार्थी तबलावादन करणार आहेत. हे विद्यार्थी गेली कित्येक वर्षे गुरुजींकडे तबला शिकत आहेत. आता ते नामवंत तबलावादक म्हणून आपली कारकिर्द घडवत आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमात रत्नागिरीत तबल्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थीही तबलावादन करणार आहेत. रत्नागिरीत खूप मोठ्या प्रमाणात मुले तबला शिकत आहेत. मुलांना चांगले तबलावादनाचे कार्यक्रम ऐकायला मिळावेत, यासाठी हा कार्यक्रम रत्नागिरीत करायचे शिष्य परिवारातर्फे ठरवले आहे.
दिवसभर दिग्गज लोकांचे तबलावादन या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना ऐकायला मिळणार असून, ही तबला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगितिक मेजवानीच आहे, त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिष्य परिवारातर्फे करण्यात आले आहे.




