
रक्षाबंधनची रत्नागिरी एसटी विभागाला ओवाळणी, ४ लाख ८७ हजार ६९० रुपयांचे जादा उत्पन्न
रक्षाबंधनानिमित्त प्रवासी राजाकडून एसटी रत्नागिरी विभागाला भरघोस अशी ओवाळणी प्राप्त झाली आहे. जिल्हाभरातून ५९ जादा एसटी गाड्यांचे नियोजन विभागाकडून करण्यात आले होते. यामध्ये एकूण ४ हजार ४१६ प्रवाशांनी एसटीचा लाभ घेतला असून सुमारे ४ लाख ८७ हजार ६९० रुपयांचे जादाचे उत्पन्न एसटी रत्नागिरी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळाला मोठे उत्पन्न प्राप्त करून दिले. दरवर्षी एसटीला रक्षाबंधन व भाऊबीज (दिवाळी) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण या दिवशी भाऊ-बहिणींकडे किंवा बहिण-भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्षे रक्षाबंधनाच्या सणाच्या कालावधीत एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसर्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
www.konkantoday.com