
योगशास्त्रातून देशाला जगाला सुदृढ करूयात
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांचा स्वातंत्र्यदिनी संकल्प
आपले भारतीय ज्ञान जितके विस्तृत आहे तितकेच सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करणारे आहे. यातीलच मूळचे भारतीय असलेले योगशास्त्र सध्या जागतिक पातळीवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी योगशास्त्रातून देशाला व जगाला सुदृढ करण्याचा आजच्या स्वातंत्र्यदिनी संकल्प करूयात असे प्रतिपादन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी केले.
ते स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीस उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपकेंद्रामार्फत घेण्यात आलेल्या निःशुल्क योग वर्गातील सहभागी रत्नागिरीकरांना प्रमाणपत्र वितरीत करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमात एम ए योगशास्त्राचे विद्यार्थी भारत सावंत यांनी बलसागर भारत होवो या गीताचे सादरीकरण केले.
यानंतर निःशुल्क योग वर्गातील एकूण ३० सहभागी रत्नागिरीकरांना संचालक डॉ दिनकर मराठे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाला एकूण ५० जणांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला सर्व सहभागी योगसाधक, उपकेंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अक्षय माळी यांनी केले.




