
ब्राह्मण समाज म्हणजे पाताळयंत्री.. ठाण्यातील नेत्याला सोडणार नाही.. आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यामुळे वाद आणखी पेटणार
गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच पेटलंय.शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. मुंबईतील एका मेळाव्यात भास्कर जाधवांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर आणि त्यांच्या गुहागर तालुका अध्यक्षांवर जळजळीत टीका केली. त्यांनी संघाच्या अध्यक्षांविरोधात आक्रमक विधान केले असून, या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोमवारी मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांना बेडकाची उपमा दिली. ‘ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. मला परिणामांची चिंता नाही’, असं आक्रमक वक्तव्य त्यांनी केलं होतं.मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, ‘निवडणुकीदरम्यान, मला पराभूत करण्यासाठी बौद्ध समाजाला माझ्याविरोधात भडकवण्यात आलं होतं. वंचित आघाडीचे नेते अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात माझं नाव गोवलं गेलं. ठाण्यातील राजकीय नेत्याला मी सोडणार नाही’, असं भास्कर जाधव म्हणाले.यावेळी भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांच्यावर वैयक्तिक टिका केली. ‘घनशाम जोशींनी पक्ष म्हणून पत्र लिहिलं असतं तर ठीक होतं. पण जोशींनी समाजाच्या नावानं पत्र लिहिलं. त्याचं मला वाईट वाटलं. माझ्याविरोधात जिल्ह्यात किंवा राज्यात पत्र द्या. मी गटारात फेकून देईन’, अशा शब्दांत ब्राह्मण सहाय्यक संघाबाबत भास्कर जाधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.माझ्या आईबद्दल कुणीही अपशब्द वापरला . त्यांना मी कधीच माफ करणार नाही. तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीत अंगावर केसेस घेणारा जाधव आहे. पण जेव्हा आईविरूद्ध अपशब्द वापरले, तेव्हा विनय नातूटाळ्या वाजवत होते. त्यांची समोरासमोर लढण्याची हिंमत नाही. म्हणून बदनामी आणि खच्ची करण्याचे काम सुरूये’, असं भास्कर जाधव म्हणाले.