कुतूहल: आंबवलेले पदार्थ पौष्टिक कारण…

✒️डॉ. सुहास कुलकर्णी

किण्वन म्हणजे आंबवणे. यालाच फर्मेंटेशन असे म्हणतात. ही एक जैवरासायनिक प्रक्रिया असून या प्रक्रियेत सूक्ष्मजीव प्राणवायूविरहित वातावरणात शर्करेचे अपघटन करून ऊर्जा निर्माण करतात. किण्वनाच्या या शास्त्राला ‘झाइमॉलॉजी’ म्हणून संबोधले जाते. प्राचीन काळापासून अल्कोहोलयुक्त पेये तयार करण्यासाठी किण्वनाचा वापर केलेला आढळून आला आहे. १८२६ मध्ये अमेरिकन शोधक ‘सॅम्युअल मोरे’ यांनी मक्याचे किण्वन करून इथेनॉल तयार केले होते.

अठराव्या शतकात फ्रेंच वैज्ञानिक लुई पाश्चर यांनी सूक्ष्मजीवांद्वारे किण्वन प्रक्रियेने दही, बीअर व वाइन तयार करता येते, हे दाखवून दिले. लॅक्टोबॅसिलाय या जीवाणूंमार्फत दुधातील लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक आम्लात होते. यामुळे दुधातील प्रथिने साकळतात आणि त्यांचे रूपांतर दह्यात होते. १८९७ साली जर्मन शास्त्रज्ञ एडवर्ड बुकनर यांनी यीस्ट पेशींचा अर्क तयार करून तो साखरेत टाकून किण्वन प्रक्रिया घडून आणली. त्यातून कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडला आणि अल्काहोलची निर्मिती झाली. यातून त्यांनी असा सिद्धांत मांडला की, सूक्ष्मजंतूंच्या पेशीतील विकरांमुळे किण्वन होते. या संशोधनासाठी १९०७ साली त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, एरिथ्रोमायसीन व टेट्रासायक्लीन ही प्रतिजैविके किण्वन प्रकियेमार्फत तयार केली जातात. बीअर तयार करण्यासाठी बार्लीच्या दाण्यांतील ग्लुकोजचे किण्वन केले जाते; तर वाइन तयार करताना द्राक्षाच्या रसातील ग्लुकोजचे यीस्टच्या माध्यमातून अपघटन केले जाते. किण्वन प्रक्रिया निर्जंतुक केलेल्या फर्मेंटर किंवा बायोरिअॅक्टर नावाच्या संयंत्रात केली जाते. या प्रक्रियेचे प्रामुख्याने पुढील प्रकारे प्रकार आहेत – १) लॅक्टिक आम्ल किण्वन : (दह्यासाठी), २) अल्कोहोल किण्वन : (वाइन, बीअर, जैवइंधनसाठी), ३) ॲसेटिक आम्ल किण्वन : (व्हिनेगरसाठी), ४) ब्युटीरिक आम्ल किण्वन : (ज्यूट फायबर, रॅन्सिड बटर, तंबाखू प्रक्रिया आणि चामड्याच्या टॅनिंगसाठी) ५) मिथेनोजेनेसिस किण्वन : याला विनॉक्सी पचन प्रक्रिया असेही म्हणतात. (सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांमध्ये मिथेन वायू तयार होतो.)

आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आंबवल्याने अन्न पौष्टिक, पचण्याजोगे आणि चवदार होते. आंबवण्याच्या प्रक्रियेत चांगले जिवाणू वाढतात. या जिवाणूंना प्रोबायोटिक म्हणतात. आंबवलेले अन्न खाण्याचे अनेक फायदे आहेत. आंबवलेल्या अन्नातील पोषकतत्त्वे शरीरात सहज शोषली जातात. त्यामुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात, शरीरात जीवनसत्त्व ‘ब’ आणि जीवनसत्त्व ‘क’ तयार करण्याची क्षमता निर्माण होते. एकंदरीत हृदयाचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि जीवनसत्त्व ‘क’, लोह (आयर्न), झिंक इत्यादींचे प्रमाण वाढते.

मराठी विज्ञान परिषद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button