
रत्नदुर्ग किल्ल्यावर गोळा केलेला कचरा उचलण्याची नगरपालिकेकडे मागणी
रत्नागिरी : शहराजवळील रत्नदुर्ग किल्ला (शिवसृष्टी बाजूचा परिसर) येथे ३ ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील कचरा गोळा करून एका ठिकाणी जमा करण्यात आला आहे. मात्र रत्नागिरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही अद्यापही हा कचरा त्याच ठिकाणी पडून आहे. हा कचरा तातडीने उचलावा आणि किल्ला परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी यासाठी गड-किल्ला प्रेमी तन्मय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज (११ ऑगस्ट) रत्नागिरी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला निवेदन दिले.
रत्नदुर्ग किल्ल्यावर ३ ऑगस्ट रोजी स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील कचरा गोळा करून एका ठिकाणी जमा करण्यात आला आहे. हा कचरा उचलण्यासाठी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला; मात्र या अधिकाऱ्यांनी “हो” असे म्हणून किंवा “गाडी लहान आहे” असे सांगून कार्यवाही टाळली. त्यामुळे आजतागायत हा कचरा तसाच पडून असून परिसराचे सौंदर्य, स्वच्छता व पर्यावरण धोक्यात आले आहे.
या साठवून ठेवलेल्या कचऱ्यामुळे पर्यटनस्थळाची प्रतिमा खराब होत असून, गड-किल्ला संवर्धन कार्यात अडथळा येत आहे आणि मुख्य म्हणजे येथील रहिवाशांच्या व पर्यटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच याठिकाणी तातडीने स्वच्छता गाडी पाठवून कचरा उचलण्यात यावा व संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबतचा अहवाल प्राप्त करण्यात यावा. तसेच रत्नदुर्ग किल्ला (शिवसृष्टी बाजूचा परिसर) येथे नियमित स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी तन्मय जाधव यांच्यासह विजय यादव (धर्म जागरण वर्ग), गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागाचे शशिकांत जाधव, शुभम आग्रे उपस्थित होते.




