
आमच्या जाळ्यात भरपूर मासळी मिळू दे आणि वादळीवार्यापासून त्यांचे रक्षण कर, कोळी बांधवांचे साकडे
नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीचा थाट यावेळी अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. दरवर्षी कोळी बांधव या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. मासेमारी बंदी काळात बोटींची दुरुस्ती आणि या सणाची तयारी जोरदार असते. मासेमारीच्या होड्यांची रंगरंगोटी, झेंडे-पताक्यांची बहारदार सजावट व महिलांनी तयार केलेल्या चवदार नारळाचे पदार्थ असा थाट या सणाला असतो. हर्णे, पाजपंढरी, दाभोळ, बुरोंडी, येथे नारळी पौर्णिमेसाठी कोळीवाडे दरवर्षी रोषणाईने सजतात.
शासन आदेशाने 31 जुलैला मासेमारी बंदी उठत असली तरी खरी मासेमारी ही नारळी पौर्णिमा सणानंतर सुरू होते. यानिनिमित्त शुक्रवारी सायंकाळी दर्याला सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करून आणि बोटींची पूजा यावेळी कोळी बांधवांनी केली, तर हर्णे, पाज या ठिकाणी शाकारलेल्या बोटी मासेमारीला खोल समुद्रात जण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यावेळी येथील कोळी बांधवांनी दर्या राजाची विधिवत पूजा करून सोनेरुपी नारळ दर्या राजाला अर्पण केला. ‘दर्या राजा आज तुला सोने रुपी नारळ अर्पण करून मासेमारी हंगामाची सुरुवात करत आहोत, आमच्या कोळी बांधवांच्या जाळ्यात भरपूर मासळी मिळू दे आणि वादळीवार्यापासून त्यांचे रक्षण कर’, असे साकडेदेखील यावेळी कोळी बांधवांनी दर्या राजाला घातले.