
सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात साईनगरग्रामस्थ आक्रमक,गणपतीच्या आधी रस्ता खड्डेमुक्त न केल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा
रत्नागिरी शहराजवळील काजरघाटी धार ते आरटीओ कुवारबाव नाका रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यातून वाहन चालवताना चालकांची नाकीनऊ येत असून, खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा छोटे मोठे अपघातही घडत आहे. या सर्वाला कंटाळून आता साईनगर येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात १५ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेतला आहे.
रत्नागिरी शहराजवळील काजरघाटी धार ते आरटीओ कुवारबाव नाका या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. मात्र हा रस्ता खड्डेमय झाला असल्याने या रस्त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहन चालकांचा अक्षरशः कस लागत आहे. येथील ग्रामस्थांना या खड्ड्यांचा मोठा त्रास होत असून या ठिकाणी दररोज छोटे- मोठे अपघात घडत आहेत. याबाबतची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आता गणपतीचा सण ही जवळ आला असून आता थोड्याच दिवसांनी या परिसरातील ग्रामस्थ या रस्त्यावरून गणपती घेऊन जातील. त्यामुळे गणपतीच्या आधी हे हा रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच हे खड्डे भरले नाहीत, तर साईनगर येथील ग्रामस्थ १५ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उपोषणाला बसणार, असा इशारा साईनगरचे ग्रामस्थ महेश नागवेकर, आशिष शिवलकर, मनोज भाटकर, साई विलणकर आणि कुवारबावचे माजी उप सरपंच नरेश विलणकर, चेतन पाटील यांनी दिला आहे.