
२७ लाख अपात्र लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू; अंगणवाडी सेविका घरोघरी; पुढच्या टप्प्यात ‘या’ निकषाची पडताळणी, ५० लाख महिला ठरतील अपात्र, वाचा…
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातील ४२ लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीतील २६ लाख ३४ हजार महिला आहेत. त्या सर्वांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यास पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांची पडताळणी सुरू केली आहे. त्यात २१ पेक्षा कमी आणि ६५ पेक्षा जास्त वयोगटातील महिला व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून दोन कोटी ५९ लाख महिलांचे अर्ज आले. त्यामुळे दरवर्षी लाडक्या बहिणींसाठी ५४ हजार कोटी रुपये लागतील, असे शासनाकडून सुरवातीला स्पष्ट करण्यात आले. तरीपण, २०२५- २६ च्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणींची निकषांच्या आधारे पडताळणी सुरू झाली.
सुरवातीला चारचाकी वाहन असलेल्यांची तपासणी झाली. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, याशिवाय शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी झाली. सरकारी नोकरदार महिला, बोगस पुरूष लाभार्थींचीही पडताळणी झाली. आता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून वयोगट व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थींची तपासणी सुरू आहे. त्यानंतर २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे.
आजपासून पडताळणी सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र आहे. तरीदेखील २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील १६ हजार ७८ आणि एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त ८३ हजार ७२२ महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या याद्या प्राप्त झाल्या असून त्यानुसार आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली आहे. -रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
‘आयकर’च्या माहितीवरून ५० लाख महिला अपात्र?
लाडकी बहीण योजनेत धनाढ्य विशेषत: कुटुंबाचे वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिला देखील आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इन्कम टॅक्स विभागाला यापूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांची यादी मागितली आहे. त्यानुसार लाडकी बहीण योजनेतील आणखी अंदाजे ५० लाखांवर महिला अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
लाडकी बहीण योजनेची सद्य:स्थिती
- एकूण लाभार्थी
२.५९ कोटी
- सुरवातीचा दरमहा निधी
३,८५५ कोटी
- पडताळणीत अपात्र लाभार्थी
४२.२८ लाख
- आता दरमहा लागणारा निधी
३,२२५ कोटी